Godrej Family Split: देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक असलेल्या गोदरेज कुटुंबाच्या साम्राज्याची आता वाटणी होणार आहे. गोदरेज समूहाची दोन भागात वाटणी करण्याचा करार या कुटुंबानं केलाय. या करारानुसार आदि गोदरेज आणि त्यांचे बंधू नादिर गोदरेज समूहातील लिस्टेड कंपन्यांचे मालक असतील. जमशेद आणि स्मिता या चुलत बहिणींना अनलिस्टेड कंपन्या आणि भूखंडाचा ताबा मिळणार आहे. गोदरेज समूहानं शनिवारी संध्याकाळी उशिरा शेअर बाजारांना पाठवलेल्या नोटीसमध्ये ही माहिती दिली. या करारामध्ये रॉयल्टी, ब्रँडचा वापर आणि लँड बँकेच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांकडेही गोदरेज समूहानं लक्ष वेधलं आहे.
१२७ वर्षे जुन्या गोदरेज समूहाचा व्यवसाय साबणापासून ते घरगुती उपकरणांची निर्मिती, तसंच रिअल इस्टेटपर्यंत पसरलेला आहे. परस्पर आदर, सदिच्छा, मैत्री आणि सलोखा राखण्यासाठी आणि कुटुंबातील प्रत्येकांच्या आकांक्षा आणि विविध रणनितींनी पूर्ण करण्यासाठी कुटुंबामध्ये एक फॅमिली सेटलमेंट अॅग्रीमेंटवर एकमत झालं आहे," असं करारात नमूद करण्यात आलंय.
कोणाला काय मिळणार?
गोदरेज समूहानं जारी केलेल्या निवेदनानुसार, हा समूह गोदरेज कुटुंबातील दोन शाखांमध्ये विभागण्यात आलाय. एका बाजूला आदि गोदरेज (८२), त्यांचे बंधू नादिर (७३) आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे चुलत भाऊ जमशेद गोदरेज (७५) आणि स्मिता गोदरेज कृष्णा (७४) आहेत. या करारानुसार आदि गोदरेज आणि त्यांचे बंधू नादिर यांना गोदरेज इंडस्ट्रीजचे हक्क मिळाले. जमशेद आणि स्मिता गोदरेज यांना मुंबईत अनलिस्टेड कंपन्या, गोदरेज अँड बॉयस आणि त्याच्याशी संबंधित कंपन्या, तसंच मुंबईतील प्राईम प्रॉपर्टीसह मोठा भूखंड मिळणार आहे.
शेअर्सची पुनर्रचना होण्याची शक्यता
विभाजनानंतर आता गोदरेज कंपन्यांमधील शेअर्सची पुनर्रचना होऊ शकते. दोन्ही गट गोदरेज ब्रँडचा वापर करत राहतील आणि आपला वारसा वाढविण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहेत, असं गोदरेज कुटुंबानी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय.