नवी दिल्ली : सलग तिसऱ्या दिवशी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात घसरणीचा कल नोंदला गेला. बुधवारी सोन्याचा भाव १६५ रुपयांनी घटून २६,००० रुपये तोळा झाला. हा गेल्या चार महिन्यांचा नीचांक आहे. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर ही घट झाल्याचे दिसून आले. चांदीचा भावही २५० रुपयांच्या घसरणीसह ३५,४०० रुपये प्रतिकिलो राहिला.विश्लेषकांनी सांगितले की, जागतिक बाजारात घसरणीचा कल राहिल्याने स्थानिक सराफ्यात सोन्याच्या भावात ही घट नोंदली गेली आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या आगामी बैठकीपूर्वी जागतिक बाजारात घसरणीचा कल आहे. याचा बाजार धारणेवर नकारात्मक परिणाम झाला. सिंगापूर येथे सोन्याचा भाव घसरणीने १,१४८.९९ डॉलर प्रतिऔंस व चांदीचा भाव ०.२ टक्क्यांनी घटून १५.५३ डॉलर प्रतिऔंस राहिला.दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १६५ रुपयांनी कोसळून अनुक्रमे २६,००० रुपये व २५,८५० रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,६०० रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव २५० रुपयांनी घटून ३५,४०० रुपये किलो आणि साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १५५ रुपयांच्या घसरणीसह ३५,५२० रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भावही १,००० रुपयांच्या घसरणीसह खरेदीसाठी ५४,००० रुपये व विक्रीकरिता ५५,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने २६ हजारांवर; चार महिन्यांचा नीचांक
By admin | Published: March 18, 2015 11:20 PM