नवी दिल्ली : सुमारे २ महिन्यांच्या कालावधीनंतर सोन्याचा भाव पुन्हा एकदा २७ हजारांच्या वर गेला. ४८0 रुपयांची वाढ झाल्यानंतर राजधानी दिल्लीत सोने २७,१८0 रुपये तोळा झाले. चांदीचा भाव २00 रुपयांनी वाढून ३६,५00 रुपये किलो झाला. सराफा बाजारातील सूत्रांनी सांगितले की, जागतिक बाजारातील तेजी, तसेच हंगामी मागणीचा लाभ सोन्याला मिळाला. औद्योगिक क्षेत्रातील तसेच नाणे निर्मात्यांकडून मागणी वाढल्यामुळे चांदीचा भाव वाढला.जागतिक बाजारात सोने ६ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. ताज्या माहितीनुसार, अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढीचा निर्णय लांबणीवर टाकला जाण्याची शक्यता आहे. महागाईचा दर कमी असल्यामुळे फेडरल रिझर्व्ह लगेच दरवाढ करणार नसल्याचे मानले जात आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून सराफा बाजारातील धारणा मजबूत झाली आहे.याशिवाय रुपयाची घसरणही बाजाराला उभारी देणारी ठरली. रुपया दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेल्यामुळे सोन्याची आयात महाग होणार आहे. भारतातील सोन्याच्या भावावर परिणाम करणाऱ्या सिंगापूर येथील बाजारात सोन्याचा भाव १.४ टक्क्यांनी वाढून १,१६८.३९ डॉलर प्रति औंस झाला. ७ जुलैनंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने २७ हजारांवर
By admin | Published: August 21, 2015 10:11 PM