लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सोमवारी सराफा बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) वेबसाइटनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ७०७ रुपयांनी घसरून ५९,६०१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. २२ कॅरेटच्या सोन्याचा भाव ५४,५९५ रुपये झाला.
आयबीजेएच्या वेबसाईटनुसार, चांदी ९३५ रुपयांनी उतरून ७१,४२३ रुपये प्रतिकिलो झाली. काही दिवसांपासून साेन्याच्या दरात घट झाली आहे़. सोन्याने ५ मे रोजी ६२ हजार रुपये प्रति तोळ्याची उच्चांकी पातळी गाठली होती़. त्यानंतर महिनाभरात दर ३ हजार रुपयांपेक्षा खाली आले आहेत.
प्रमाणित सोनेच खरेदी करा
- ६ अंकी बीआयएस हॉलमार्क असलेले प्रमाणित सोनेच ग्राहकांनी खरेदी करायला हवे. - हॉलमार्क नसलेले सोने विकण्यास १ एप्रिलपासून बंदी घालण्यात आली आहे. - आधार कार्डवर जसा १२ अंकी कोड असतो, तसाच दागिन्यांवर ६ अंकी हॉलमार्क असतो. - अक्षरे आणि आकडे यांचा मिळून तो बनलेला असतो. हॉलमार्कवरून सोने किती कॅरेटचे आहे, हे कळते.