Join us

सोने पुन्हा ५३ हजार रुपयांच्या उंबरठ्यावर; आठवडाभरात १४०० रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 5:59 AM

सोन्याचे भाव वाढत असताना चांदीच्या भावात मात्र आठवडाभरात चढ-उतार होताना दिसून आला

जळगाव : केंद्र सरकारने सोन्याच्या आयातीवरील कर १२ टक्के करताच सोन्याचे दर दोन महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असून, आठवडाभरात ते एक हजार ४०० रुपयांनी वधारले आहेत. त्यामुळे सोमवार, ४ जुलै रोजी ते ५२ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. चांदीच्या भावात मात्र चढ-उतार होत आहे. 

दोन आठवड्यांपूर्वी सोने-चांदीच्या भावात घसरण होत गेली. मात्र, आता आठवडाभरापासून सोन्याच्या भावात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सोमवार, २७ जून रोजी ५१ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर असलेले सोने ३० जूनपर्यंत त्याच भावावर स्थिर होते. त्यानंतर १ जुलै रोजी त्यात ६०० रुपयांची वाढ झाली व ते ५२ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. २ रोजी पुन्हा त्यात ६०० रुपयांची वाढ होऊन ते ५२ हजार ६०० झाले. सोमवार, ४ जुलै रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुवर्ण बाजार उघडताच पुन्हा २०० रुपयांची वाढ होऊन सोने ५२ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. 

डॉलरचे दर वाढल्याने सोन्याचे भाव वाढलेआंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याला मागणी वाढण्यासह डॉलरचे दरही ७८.९१ रुपये झाल्याने सोन्याचे भाव वाढत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

चांदी ६१ हजारांवरसोन्याचे भाव वाढत असताना चांदीच्या भावात मात्र आठवडाभरात चढ-उतार होताना दिसून आला. गेल्या सोमवारी, २७ जून रोजी ६१ हजार २०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात घसरण होत जाऊन ती ३० जून रोजी ६० हजार २०० रुपयांवर आली. त्यानंतर मात्र १ जुलै रोजी एक हजार ८०० रुपयांची वाढ होऊन चांदी ६२ हजारांवर पोहचली. २ जुलै रोजी त्यात एक हजाराची घसरण होऊन ती ६१ हजार रुपये प्रति किलोवर आली. तेव्हापासून ती याच भावावर स्थिर आहे.

टॅग्स :सोनं