नवी दिल्ली : सोन्याच्या किमती दररोज नवा विक्रम प्रस्थापित करीत आहेत. या वर्षभरात सोन्याच्या दराने ४१ वेळा उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत सोन्याच्या किमतीत तब्बल ३४ टक्के वाढली आहे. इतिहासात पहिल्यांदा सोन्याची किंमत २,६०० डॉलर्स प्रती औंसहून अधिक झाली आहे. १९७९ नंतर प्रथमच सोने सर्वोत्तम कामगिरीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ४५ वर्षांपूर्वी सोन्याची किंमत १२० टक्के वाढली होती.
२०११ मध्ये सोन्याचे दर ३४ वेळा उच्चांकी पोहोचले. अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने वाढलेली अनिश्चितता आणि आशियात निर्माण झालेला तुणाव या प्रमुख कारणांमुळे सोन्याच्या किमती कडाडल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाचे निकाल जाहीर झाल्यानंतर ही दरवाढ कायम राहणार का, हे समजू शकणार आहे.
प्रथमच ८२ हजारांपुढे?
भारतात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबरमध्ये वितरित होणाऱ्या सोन्याचे दर गुरुवारी १३ रुपयांनी वाढून ७८,४४३ रुपयांवर बंद झाले. दिवाळीच्या एक दिवस आधी दिल्लीत सोन्याच्या किमतीत १ हजार रुपयांची वाढ पहायला मिळाली होती. त्यामुळे सोने ८२ हजारांच्या पुढे गेले होते. सणासुदीचा हंगाम असल्याने भारतात सोन्याची मागणी दरवर्षीप्रमाणे वाढली आहे. परंतु यंदा झालेली वाढ ऐतिहासिक आहे.
किमती किती वाढणार?
जाणकारांच्या मते सोन्याचे दर नजीकच्या काळात प्रतितोळा ८१ हजार रुपयांपर्यंत वाढू शकतात तर दीर्घकाळात किमती प्रतितोळा ८६ हजारापर्यंत झेपावू शकतात. अमेरिकेच्या कॉमेक्सवर सोने मध्यम अवधीमध्ये २,८३० डॉलर्स प्रती औंस तर दीर्घकाळात प्रती औंस ३,००० डॉलर्स पर्यंत वाढू शकतो, असा अंदाज आहे. अलिकडे गुंतवणुकीतून जोरदार परतावा देणारे म्हणून पुढे आले आहे.