Join us

सणासुदीपूर्वी सोनं पुन्हा चमकलं! ७६ हजारांचा टप्पा ओलांडला; बाजारातील तज्ञ म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 12:12 PM

Gold Record High Price: यंदा आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवर सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होत आहे. सोने लवकरच विक्रमी पातळीवर पोहचण्याची शक्यता आहे.

Gold Record High Price : गेल्या काही दिवसांपासून सोन्याने चांगलाच भाव खाल्ला आहे. सणासुदीचा हंगाम आणि व्याजदरात कपातीचा परिणाम सोन्याच्या दरावरही दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्याची चमक सातत्याने वाढत आहे. या दोन्ही पातळ्यांवर सोन्याच्या किमती पुन्हा नव्या विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. देशांतर्गत बाजारात सोन्याने ७६ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हा दर ७८ हजार पार करू शकतो, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.

सोन्याने पार केला 76 हजार रुपयांचा टप्पामंगळवारी, अमेरिकन बाजारात स्पॉट आणि वायदेबाजार दोन्ही सौद्यांमध्ये सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली होती. व्यवहारादरम्यान एका क्षणी स्पॉट सोन्याच्या किमतीने २,६३८.३७ डॉलर प्रति औंसचा नवा उच्चांक गाठला. तर यूएस सोन्याच्या वायदेबाजारात किंमत प्रति औंस २,६६१.६० डॉलरवर गेली. तर देशांतर्गत बाजारात सोन्याने 76 हजार रुपयांचा दर पार केला आहे. CNBC TV18 च्या वृत्तानुसार, मंगळवारी भारतीय बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,३३० रुपये प्रति १० ग्रॅम झाली.

फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातअमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात व्याजदर कपात केली. याचा सकारात्मक परिणाम शेअर्सपासून सोने आणि क्रिप्टोपर्यंतच्या विविध मालमत्ता वर्गांवर होत आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात अपेक्षेपेक्षा ०.५० टक्क्यांनी कपात केली. फेडरल रिझर्व्हने यावर्षी आणखी कपात करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर विविध मालमत्ता वर्गांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. यात सोन्यालाही झळाळी मिळाली.

सणांच्या काळात खरेदी वाढतेयेत्या काही दिवसांत सोन्याचे भाव आणखी वाढणार असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. देशांतर्गत स्तरावर नजर टाकली तर येत्या काळात लागोपाठ सण येत आहेत. नवरात्रीनंतर दिवाळी, धनत्रयोदशी असे सण येत आहेत. या हंगामात भारतीय लोक जास्त सोने खरेदी करतात. कारण सणांच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.

सोने ७८ हजारांचा टप्पा ओलांडणार?याशिवाय नवरात्रीनंतर देशात लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. लग्नाचा हंगाम हा परंपरेने जास्त खरेदीचा आणि सोन्याच्या वाढत्या किमतींचा हंगाम असतो. यंदाही लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी जोरात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात सोने ७८ हजार रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :सोनंगोल्ड स्पॉट एक्स्चेंजगुंतवणूक