Join us

खाद्यतेल आणि सोने महागणार! सरकारने आयात शुल्क वाढवले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 7:10 PM

gold and edible oil : सरकारकडून दर पंधरा दिवसांनी खाद्यतेल, सोने आणि चांदीच्या आधारभूत आयात किंमतीत बदल केला जातो.

नवी दिल्ली : महागाईपासून दिलासा मिळत असतानाच पुन्हा सर्वसामान्य लोकांसाठी अडचणी वाढवणारी बातमी आहे. कारण भारतीय बाजारात पामतेल आणि सोन्या-चांदीच्या किमती लवकरच वाढू शकतात. जागतिक बाजारपेठेतील सतत वाढत असलेल्या किमती लक्षात घेऊन सरकारने सोने-चांदी, कच्चे पाम तेल (CPO) आणि सोया तेलाच्या आधारभूत आयात किंमतीत वाढ केली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारातील त्यांच्या किमतींवरही परिणाम दिसून येईल. सरकारकडून दर पंधरा दिवसांनी खाद्यतेल, सोने आणि चांदीच्या आधारभूत आयात किंमतीत बदल केला जातो. या किमती आयातदारांकडून आकारल्या जाणार्‍या कराची गणना करण्यासाठी वापरल्या जातात. भारत हा खाद्यतेल आणि चांदीचा जगातील सर्वात मोठा आयातदार आणि सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे.

नवीन आधारभूत किंमतवृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या पाम तेलाची मूळ आयात किंमत 977 डॉलर प्रति टन इतकी वाढवण्यात आली आहे, तर आधी ती 971 डॉलर होती. आरबीडी पाम तेलाची मूळ आयात किंमत 977 डॉलरवरून 979 डॉलर प्रति टन करण्यात आली आहे. याचबरोबर,आरबीडी पॉमोलिन (RBD Palmolein)ची मूळ आयात किंमत 993 डॉलरवरून कमी करून 988 डॉलर प्रति टन करण्यात आली आहे. तसेच, कच्च्या सोया तेलाची आधारभूत किंमत 1,360 डॉलरवरून कमी करून 1,275 डॉलर प्रति टन इतकी करण्यात आली आहे. सोन्याची मूळ आयात किंमत 565 डॉलरवरून वाढ होऊन 588 डॉलर प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची मूळ आयात 699 डॉलरवरून वाढ होऊन 771 डॉलर प्रति किलो करण्यात आली आहे.

काय आहे मूळ आयात किंमत? जागतिक बाजारात पामतेल आणि सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होत असताना भारतीय आयातदारांवरही परिणाम होतो. देशांतर्गत बाजारातील किमती जागतिक बाजाराशी सुसंगत ठेवण्यासाठी सरकार दर पंधरवड्याला (15 दिवसांत) आधारभूत आयात मूल्याचा आढावा घेते. मूळ आयात किंमत हा दर असतो की, ज्याच्या आधारावर सरकार व्यापार्‍यांकडून आयात शुल्क आणि कर आकारते. सोन्याच्या बाबतीत भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आयात करणारा देश आहे, तर चांदीच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. खाद्यतेलाची 60 टक्क्यांहून अधिक गरजही आयातीतून भागवली जाते.

टॅग्स :सोनंव्यवसाय