Join us

ऐन सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या बाजारात मंदी

By admin | Published: September 26, 2014 5:16 AM

बाजारातील जाणकारांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याच्या भावाने आठ महिन्यांचा नीचांक गाठला.

नवी दिल्ली : दोन दिवसांच्या तेजीनंतर जागतिक बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याचा भाव २५० रुपयांनी स्वस्त होऊन २६,९६० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा भावही ६५० रुपयांनी कोसळून ३९,३५० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.बाजारातील जाणकारांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याच्या भावाने आठ महिन्यांचा नीचांक गाठला. याचा स्थानिक बाजार धारणेवर नकारात्मक परिणाम होऊन या मौल्यवान धातूंची खरेदी घटली. सणासुदीतच सोने-चांदीचा भाव घसरला आहे.सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव ०.८ टक्क्यांनी घसरून १,२०६.०४ डॉलर प्रतिऔंस झाला. गेल्या २ जानेवारीनंतरची ही नीचांकी पातळी आहे. चांदीचा भावही १.३ टक्क्यांनी घटून १७.४६ डॉलर प्रतिऔंसवर आला. जुलै २०१० नंतर यात झालेली ही सर्वांत मोठी घट आहे. तयार चांदीचा भाव ६५० रुपयांनी घटून ३९,३५० रुपये किलो झाली. तसेच चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ७५५ रुपयांनी कमी होऊन ३८,८५५ रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. गेल्या दोन सत्रांत या मौल्यवान धातूच्या भावात ७५० रुपयांची वाढ झाली होती. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ६९,००० रुपये व विक्रीसाठी ७०,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)