Join us

सोन्या-चांदीचे भाव वधारले

By admin | Published: September 25, 2014 3:24 AM

सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होत असल्यामुळे बुधवारी सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. सोने २१0 रुपयांनी, तर चांदी ५00 रुपयांनी वाढली

नवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होत असल्यामुळे बुधवारी सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. सोने २१0 रुपयांनी, तर चांदी ५00 रुपयांनी वाढली. आगामी काळातील लग्न सराईचाही भाववाढीला हातभार लागल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले.आजच्या भाववाढीनंतर सोने २७,२१0 रुपये तोळा, तर चांदी ४0 हजार रुपये किलो झाली. चांदीच्या भावातील वाढ औद्योगिक क्षेत्रातील वाढीव मागणीमुळे झाली. विशेषत: चांदीचे शिक्के बनविणाऱ्या उद्योगाकडून चांदीला मागणी आली. दिवाळी-दसऱ्यात देवदेवतांच्या प्रतिमा असलेल्या चांदीच्या शिक्क्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे ही मागणी वाढली आहे. ज्वेलर्स आणि रिटेलर्स अशा दोन्ही खरेदीदारांकडून बाजारात खरेदी सुरू आहे. सणासुदीसाठी दागिने बनविण्याचा उद्योग तेजीत आहे. त्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत तेजी दिसून आली.देशांतर्गत मागणीबरोबरच जागतिक पातळीवरील तेजीही सोन्या-चांदीच्या भाववाढीला कारणीभूत होती. मध्य-पूर्वेत तणाव वाढल्यामुळे सोन्यात गुंतवणूक करून ठेवण्याचा कल वाढला आहे. त्यातून मौल्यवान धातूची मागणी वाढली आहे. भारतातील सोन्याचा भाव सिंगापूरमधील सोन्याच्या बाजारावर अवलंबून असतो. सिंगापुरात आज सोने १,२२४.५0 डॉलर प्रति औंस झाले. काल ते १२२३.४२ डॉलर होते. सोन्याचा भाव 0.४ टक्क्यांनी वाढून १७.८६ डॉलर प्रतिऔंस झाला. राजधानी दिल्लीत आज ९९.९ आणि ९९.६ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव २१0 रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,२१0 रुपये आणि २७,0१0 रुपये तोळा झाला. काल सोने १५0 रुपयांनी वाढले होते. ८ ग्रॅम सोन्याच्या गिन्नीचा भाव मात्र २४,२00 रुपये असा स्थिर राहिला. तयार चांदीचा भाव ५00 रुपयांनी वाढून ४0 हजार रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव २६0 रुपयांनी वाढून ३९,६१0 रुपये किलो झाला. काल चांदीचा भाव २५0 रुपयांनी वाढला होता. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ६९ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७0 हजार रुपये शेकडा असा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)