नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर कल आणि स्थानिक बाजारात घटलेली मागणी यामुळे सोन्या-चांदीचा बाजार गुरुवारी घसरला. राजधानी दिल्लीत सोने १२0 रुपयांनी घसरून २६,१३0 रुपये तोळा झाले. चांदी ४८0 रुपयांनी घसरून ३४,७00 रुपये किलो झाली.जागतिक बाजारात सलग चौथ्या व्यावसायिक सत्रात सोन्याचा भाव घसरला. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे डॉलरही मजबूत झाला आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर सोन्याची मागणी घटली आहे. सिंगापूर येथील बाजारात सोन्याचा भाव 0.३ टक्क्याने घसरून १,१४६.१९ डॉलर प्रति औंस झाला. स्थानिक दागिने निर्मात्यांनी सोन्याची खरेदी कमी केली आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी आपला पैसा सराफा बाजारातून अन्यत्र वळविण्यास प्राधान्य दिले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने-चांदी घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2015 4:26 AM