Join us  

देशातील १ लाख लोकांच्या सोन्याचा होणार लिलाव; कर्ज फेडता येईना 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 6:33 AM

कोरोना काळात सोने गहाण ठेवून घेतलेले कर्ज फेडण्यास असमर्थ

मुंबई : कोरोनाच्या काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या आणि उद्योग उद्ध्वस्त झाले. त्यामुळे लोकांनी सोने गहाण ठेवून कर्ज घेतले, पण ते फेडता येत नसल्याने लाखो कुटुंबांच्या सोन्याचा बुधवारी लिलाव होणार आहे. एनबीएफसी आणि सोने कर्ज देणाऱ्या बँका बुधवारी या सोन्याचा लिलाव करणार आहेत. मुथुट फायनान्स आणि मणप्पुरम फायनान्स यांच्याकडून सर्वाधिक सोन्यावर कर्ज घेण्यात आले आहे.सोन्याच्या दागिन्यांवर किमतीच्या ७० टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाते. यात कर्जदाराला तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यात कर्ज न दिल्यास वसुली करणे अतिशय सोपे जाते.

कर्जदाराचे सोने विकून कर्ज वसूल केले जाते. या महिन्यात जवळपास १८ शहरांमध्ये लिलावाच्या ५९ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जानेवारी, २०२० म्हणजेच कोविडच्या अगदी आधी, देशातील व्यावसायिक बँकांचा एकूण सोने कर्ज आकार २९,३५५ कोटी रुपये होते. त्यात अडीच पटीने वाढ होऊन दोन वर्षांत ७०,८७१ कोटींचा आकडा पार केला आहे.

कर्ज का फेडता येईना?कोरोनामुळे देशातील ६० टक्के जनतेच्या उत्पन्नात घसरण झाली आहे. कोरोनाच्या काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला. अशा लोकांनी सोने गहाण ठेवून कर्ज घेतले, पण ते फेडता येत नाही. हे असे आर्थिक संकट आहे, जे दिसून येत नाही, असे गुंतवणूकदारांच्या जागृतीवर काम करणाऱ्या मनीलाइफ फाउंडेशनच्या संस्थापक सुचेता दलाल यांनी म्हटले आहे.

असे वाढत गेले सोने कर्जजानेवारी २०२० : २९,३५५ कोटी२०२० : ४८,८५९ कोटीडिसेंबर २०२१ : ७०,८७१ कोटी

येथे होत आहे कर्जाचा लिलाव/नोटीसचेन्नई  : १२ । बेंगळूरू : १२ । कोची : १२ । विजयवाडा : ३ हैद्राबाद : २ । मुंबई : २

टॅग्स :सोनं