Join us

संकटात सोने बनले आधार! या वर्षात मागणीमध्ये वाढीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 9:37 AM

भारतासह देशभरात महागाई अनेक वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली असून, यात आणखी वाढ होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भारतासह देशभरात महागाई अनेक वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली असून, यात आणखी वाढ होत आहे. सतत वाढत असलेल्या या महागाईमुळे भारतासह जगभरात सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महागाईसह मंदीच्या या संकटापासून वाचण्यासाठी सोने एक मोठा आधार बनला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढवणार असून यामुळे किमतीमध्ये वाढ होणार असल्याचे बाजारतज्ज्ञांनी म्हटले आहे.

सोन्याच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीने आणि सोन्याची आयात वाढल्याने सोने वापरकर्त्यांची मागणी कमी होऊ शकते, असे जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे. २०२१-२२ मध्ये सोन्याची आयात ३३.३४ टक्क्यांनी वाढून ८३७ टन झाली आहे. त्याची एकूण किंमत ४६.१४ अब्ज डॉलर आहे. ही वाढ आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत १.५ पट अधिक आहे. तर २०१६-२० च्या महामारीपूर्व सरासरी १२ टक्के अधिक आहे.

ज्वेलरीची मागणी वाढली

- भारताची सोने आयात २०२१-२२ मध्ये ज्वेलरीच्या मोठ्या मागणीमुळे वाढली आहे. 

- गेल्या आर्थिक वर्षात देशाची जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात ५० टक्क्यांनी वाढून ३० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. 

- सोने महाग झाल्याने मार्च-एप्रिलमध्ये त्याच्या विक्रीत घट झाली आहे. 

- मात्र पुन्हा एकदा २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५० हजार रुपये आल्याने दागिन्यांची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :सोनं