लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सणासुदीला सुरुवात होत असतानाच मुंबईच्या बाजारात सोमवारी सोन्याचा भाव प्रति १0 ग्रॅम ४0 हजार रुपयांच्या वर चढला. राजधानी दिल्लीत सोमवारी सोने ६७0 रुपयांनी वाढून ३९,६७0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले असून, चांदीही महागली आहे. पुढील काळात सोन्याचे दर असेच वाढत राहतील, असा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विवाहांच्या काळात ते ४१ हजार रुपयांच्याही वर जाऊ शकेल.
असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, सोने २0 आॅगस्टपासून रोज वाढून भावाचा नवा उच्चांक करीत आहे. सोमवारी चांदीही १,४५0 रुपयांनी वाढून ४६,५५0 रुपये किलो झाली. औद्योगिक क्षेत्रातून तसेच शिक्के निर्मात्यांकडून झालेली जबरदस्त खरेदी चांदीच्या पथ्यावर पडली. सोन्याच्या तेजीला अनेक घटक कारणीभूत आहेत. स्थानिक आभूषण निर्मात्यांनी केलेली जोरदार खरेदी, कमजोर रुपया आणि जागतिक बाजारातील तेजी यांचा त्यात समावेश आहे.
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे प्रमुख (वस्तू संशोधन) हरीश व्ही. यांनी सांगितले की, सोमवारी जागतिक बाजारात सोन्याचा दर १,५५४.५६ डॉलर प्रति औंसपर्यंत वर चढला होता. हा सोन्याचा सहा वर्षांचा उच्चांक ठरला आहे. मागील आठवड्यात अमेरिका आणि चीन यांनी एकमेकांवर लादलेल्या करामुळे व्यापारी संघर्ष तत्काळ मिटण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याचे महत्त्व वाढले आहे.
जागतिक शेअर बाजारातील नरमाई आणि कमकुवत जागतिक आर्थिक धारणा याचा परिणाम म्हणूनही सोन्यातील गुंतवणुकीचा पर्याय अधिक आकर्षक ठरला आहे. स्थानिक बाजारात सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ होण्यास जागतिक बाजारातील सोन्याची मजबूत स्थिती आणि रुपयातील कमजोरी हे घटक प्रामुख्याने कारणीभूत आहेत, असेही हरीश यांनी सांगितले.
डॉलरच्या तुलनेत कमीच
आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी फेडरेशनचे चेअरमन बछराज बमलवा यांनी सांगितले की, सोन्याने पहिल्यांदाच ४0 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आगामी काही महिन्यांत सोने ४१ हजारांवर जाऊ शकते. डॉलरच्या हिशेबात मात्र सोन्याचा हा दर २0 टक्क्यांनी कमी आहे. कमॉडिटी एक्स्चेंजमध्ये (कॉमेक्स) सोने १,५३४ डॉलर राहिले. सप्टेंबर २0११ मध्ये ते सर्वाधिक उच्चांकावर म्हणजेच १,९२0 डॉलरवर होते.
शेअर बाजारात जबरदस्त तेजी
केंद्र सरकारने केलेल्या घोषणांमुळे सोमवारी शेअर बाजार उसळले. सेन्सेक्स ७९२.९६ अंकांनी वाढला, तर निफ्टी २२८.५0 अंकांनी वाढला.