लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ असतानाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सोने खरेदीला सुरुवात केली आहे. डिसेंबरमध्ये २०२४ मध्ये सलग ११ महिने खरेदी केल्यानंतर केंद्रीय बँकेने थोडी विश्रांती घेतली होती. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत पुन्हा एकदा आरबीआयने सोने खरेदी केली. जानेवारी २०२५ मध्ये आरबीआयने २.८ टन सोने खरेदी केले. त्यामुळे देशाजवळचा सोन्याचा साठा वाढून ८७९.०१ टनांवर पोहोचला आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ ८ टक्के आहे. २ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाचा सोन्याचा साठा ८१२.३३ टन होता. गेल्या वर्षी आरबीआयने ७२.६ टन सोने विकत घेतले होते. भारत आणि चीनसह अनेक देश सोन्याचे साठे वाढवत आहेत. सोने महागाईपासून संरक्षण देत असते. तसेच परकीय चलन साठ्यात स्थिरता आणण्यासही सोन्यामुळे खूप मोठी मदत होत असते.
सलग सातव्या वर्षी केंद्रीय बँकेने केली सोने खरेदी (टनांमध्ये)
आरबीआयने सलग सातव्या वर्षी २०२४ मध्ये सोन्याचा साठा वाढवला आहे. गेल्या वर्षी बँकेने ७२.६ टन सोने खरेदी केले. २००१ नंतर आरबीआयची ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी खरेदी ठरली. २०२१ मध्ये ७७ टन आणि २००९ मध्ये २०० टन सोने खरेदी केले होते.
सोन्याच्या किमती उच्चांकावर
यंदा भारतात सोन्याच्या किमतींमध्ये आतापर्यंत १४ टक्के वाढ झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये याच काळात फक्त १० टक्के वाढ झाली.
मात्र, रुपयाच्या घसरणीमुळे भारतात सोन्याच्या किमती अधिक वाढल्या. यंदा आतापर्यंत रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १ टक्क्याहून अधिक कमजोर झाला आहे.
साठा कशामुळे वाढला?
तज्ज्ञांच्या मते, बदलत्या भूराजकीय परिस्थितीमुळे भारतासारखी विकसनशील राष्ट्रे सोन्याचा साठा वाढवत आहेत. रिझर्व्हचे डायव्हर्सिफिकेशन अर्थात विविधता वाढविण्यासाठी फॉरेक्स रिझर्व्हमध्ये सोन्याचा वाटा वाढवला जात आहे.
परकीय गुंतवणूकदारांची विक्री व रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर फॉरेक्स रिझर्व्हमध्ये सोन्याचा साठा वाढवणे महत्त्वाचे आहे. आरबीआयच्या परकीय चलन साठ्यात हा वाटा ११.३१ इतका आहे.
चीनने घेतले ५ टन सोने
चीनच्या केंद्रीय बँकेनेही जानेवारीत सलग तिसऱ्या महिन्यात सोने खरेदी केले. पीपल्स बँक ऑफ चायनाने जानेवारीत ५ टन सोने खरेदी केले.
यामुळे चीनचा एकूण सोन्याचा साठा २,२८५ टनांवर पोहोचला. तीन महिन्यांत चीनच्या बँकेने २० टन सोने खरेदी केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेतील विजय आणि बदललेली जागतिक स्थिती पाहता चीनकडून पुढेही सोनेखरेदी सुरू राहू शकते.