Join us

सोन्याची तेजी दहाव्या दिवशीही कायम

By admin | Published: August 19, 2015 10:42 PM

राजधानी दिल्लीत बुधवारी सोने २५ रुपयांनी वाढून २६,३३५ रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. सोन्याच्या भाववाढीचा हा सलग दहावा दिवस होता

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत बुधवारी सोने २५ रुपयांनी वाढून २६,३३५ रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. सोन्याच्या भाववाढीचा हा सलग दहावा दिवस होता. जागतिक पातळीवरील मजबुतीचा सोन्याला लाभ झाला. चांदी मात्र आजही विक्रीच्या दबावात राहिली. त्यामुळे चांदीचा भाव ६५0 रुपयांनी उतरून ३५,३00 रुपये किलो झाला. सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढ नेमकी केव्हा केली जाणार आहे, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. त्यासाठी रिझर्व्हच्या बैठकीच्या तपशिलाची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा आहे. दुसरीकडे हंगामी मागणी पूर्ण करण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांनी बाजारात खरेदी वाढविली. त्यामुळे भाव वाढण्यास मदत झाली.राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २५ रुपयांनी वाढून अनुक्रमे २६,३३५ रुपये आणि २६,१८५ रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. गेल्या नऊ दिवसांत सोन्याच्या भावात १,३३0 रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव आजही २२,४00 रुपये असा स्थिर राहिला. विक्रीच्या दबावात असलेल्या तयार चांदीचा भाव ६५0 रुपयांनी घसरून ३५,३00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा ८२५ रुपयांनी घसरून ३४,९२0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५0 हजार रुपये आणि विक्रीसाठी ५१ हजार रुपये प्रति शेकडा असा स्थिर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)