मुंबई : लग्नसराई, हमखास परताव्यामुळे वाढत्या गुंतवणुकीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतातील सोन्याच्या मागणीत १५ टक्के वाढ झाली. या अवधीत जवळपास मागणीचेप्रमाण १२३.५ टनावर गेले. यामुळे सोन्याशी निगडित उद्योग क्षेत्राला बळकटी मिळेल, अशा आशा पल्लवित झाल्या आहेत, असे जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूसीजी) म्हटले आहे.जानेवारी-मार्च २०१६ या अवधीत सोन्याच्या मागणीचे प्रमाण १०७.३ टक्के होते. सुवर्ण आभूषण उद्योगांवर उत्पादन शुल्क लावल्याने सराफा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे उपरोक्त अवधीत सोन्याच्या मागणीत कमालीची घट झाली.जागतिक सुवर्ण परिषदेने ‘सोने मागणी कल’ यावर जारी केलेल्या अहवालानुसार भारतात २०१७ च्या पहिल्या तिमाहीत मूल्याच्या प्रमाणात सोन्याची मागणी मागच्या वर्षाच्या तुलनेत १८ टक्के वाढ होऊन हा आकडा ३२,४२० कोटी रुपयांवर गेला. मागच्या वर्षी याच अवधीत मूल्याच्या प्रमाणात हा आकडा २७,५४० कोटी रुपये होता. मागील वर्षातील किमान आधारामुळे २०१७ च्या पहिल्या तिमाहीत सोन्याच्या मागणीत १५ टक्के वाढ झाली आहे. २०१३ पासून या उद्योगाला काही मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, असे जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदर पी.आर. यांनी सांगितले.सोन्याच्या दागदागिन्यांची एकूण मागणी पहिल्या तिमाहीत १६ टक्क्यांनी वाढून ९२.३ टनावर गेली. मागच्या वर्षी या अवधीत मागणी ७९.८ टन होती. मूल्यानुसार मागणीचा हा आकडा २४,२०० कोटी रुपये आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यात १८ टक्के वाढ झाली. या अवधीत सोन्यातील गुंतवणुकीत १४ टक्के वाढ झाली.सोमासुंदरम यांनी सांगितले की, लग्नसराईत सोन्याला चांगली मागणी होती. एकूण मागणीचा हा कल आणि गुंतवणूकदारांच्या पाठबळाने २०१७ च्या पहिल्या सहामाहीत सोन्याची बाजारपेठ चांगलीच उजळेल. लग्नसराई, अक्षय्यतृतीया, सरासरी पाऊस होण्याचा अंदाज तसेच नवीन चलनी नोटा चलनात आल्याने सुवर्ण आभूषणाच्या मागणीला नजीकच्या काळात बळ मिळणे अपेक्षित आहे, असेही जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे. पॅन कार्ड नोंदणी, रोख व्यवहारील निर्बंध आणि जीएसटी यासारख्या काही तात्पुरत्या आव्हानांचा विचार करता वर्षभरात भारतातील सोन्याच्या मागणीचे एकूण प्रमाण ६५० ते ७५० टन असेल, असा अंदाज जागतिक सुवर्ण परिषदेने व्यक्त केला आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)सोन्याच्या मागणीत लग्नसराईचा वाटा 40%
सोन्याच्या मागणीत झाली १५ टक्के वाढ
By admin | Published: May 05, 2017 12:39 AM