जळगाव / मुंबई : धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोने- चांदीच्या भावात पुन्हा घसरण झाली असून, ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी मिळाली आहे. गुरुवारी सोन्याच्या भावात ४०० रुपयांची घसरण होऊन ते ६० हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर आले. यामुळे सोने ६१ हजार रुपयांच्या आत आले आहे, तसेच चांदीच्याही भावात ५०० रुपयांची घसरण झाली व ती ७१ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली आहे.
चांदीचे नाणे ३०० रुपयांना
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पूजनासाठी ग्राहकांनी श्रीगणेशासह लक्ष्मीच्या प्रतिमा असलेली चांदीची नाणी खरेदी करण्यावर भर दिला आहे. चांदीच्या नाण्यांची रक्कम ३०० रुपयांपासून सुरू असून, ग्राहक लक्ष्मीची छोटी प्रतिमाही विकत घेत आहेत, असे मुंबईतील सुवर्ण विक्रेते निर्भय सिंग यांनी सांगितले.