जळगाव : उच्चांकीवर पोहचलेल्या सोने-चांदीच्या खरेदीऐवजी मोडीचे प्रमाण वाढून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची मागणी घटल्याने सोने-चांदीच्या भावात घसरण होत आहे. जळगावात शुक्रवारी सोन्याचे भाव ९०० रुपये प्रती तोळ््याने कमी झाले. सोने आता ३८ हजार ६०० रुपयांवर तर चांदीचे भाव ७०० रुपये प्रती किलोने कमी होऊन ४९ हजार ३०० रुपयांवर आले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयात सुधारणा होत असल्याने भाव कमी होण्यास मदत मिळत आहे.
रशिया व चीनने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केल्याने व आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची खरेदी वाढल्याने तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात होत असलेल्या घसरणीमुळे मेपासून सोन्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती जून्पासून तर ही वाढ अधिकच होत गेली. एका सुवर्ण दालनात एका दिवसात १० तोळे सोन्याची व एक किलो चांदीची मोड होत असे, तेथे आता २० तोळे सोन्याची व २ ते ३ किलो चांदीची मोड होऊ लागली आहे.
मोडकडे कल वाढत असल्याने मागणी कमी झाली. परिणामी सोने-चांदीच्या भावात घसरण होत आहे.
- किशोर सुराणा,
सुवर्ण व्यावसायिक.
जास्त भावात खरेदी करण्यापेक्षा मोड दिल्यास अधिक फायदा होतो. त्यामुळे जुन्या दागिन्यांची मोड दिली जात आहे.
- भरत पाटील, ग्राहक.
पूर्वी घेतलेले दागिने वापरून झाल्याने तसेच बचत म्हणून घेऊन ठेवलेल्या सोने-चांदीची वाढीव भावात मोड दिल्याने फायदाच होणार आहे.
- विनायक जाधव, ग्राहक.