जळगाव : लॉकडाऊन - ४ नंतर अनलॉक -१ मधील दुसऱ्या टप्प्यात सुवर्णबाजार सुरू होताच ५० हजारांवर पोहचलेल्या चांदीच्या भावात दुसºयाच दिवशी दीड हजार रुपये प्रति किलोे तर सोन्यामध्ये ८०० रुपये प्रति तोळ््याने घसरण झाली. त्यामुळे चांदी ४८ हजार ५०० रुपये तर सोने ४६ हजार ५०० रुपयांवर आले.
लॉडडाऊनमुळे बंद असलेला सुवर्णबाजार ५ जून रोजी सुरू झाला. लॉकडाऊन ते अनलॉक या अडीच महिन्यांच्या कालावधीत चांदीचे भाव ११ हजार रुपये प्रति किलोने वाढून ते ३९ हजार रुपयांवरून ५० हजार रुपयांवर पोहोचले. विदेशातून आवक नाही त्यात सुवर्णबाजारही बंद असल्याने बाजारपेठेत मोड येत नव्हती. त्यामुळे सोने-चांदीची चणचण निर्माण होऊन त्यांचे भाव वाढले. त्यामुळे लॉकडाऊननंतर सुवर्णबाजार उघडताच चांदीला चांगलीच चकाकी आली व ती थेट ५० हजारावर पोहोचली. सोन्याचेही भाव अशाच प्रकारे वाढून ते ४७ हजार ३०० रुपयांवर पोहोचले होते.