अमेरिकन डॉलरच्या कमजोरीमुळे, अमेरिकेतील वाढत्या महागाईमुळे, कमी व्याजदरांमुळे आणि जागतिक अस्थिरतेमुळे सोनेदातील तेजी पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर सातत्याने नवे उच्चांक गाठत आहेत. सोन्याच्या किमती वाढत जाऊन २९ मार्च रोजी प्रति १० ग्रॅम ९२,००० तर पोहोचल्या आहेत. २०२५ मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतीत १६.३% ची जबरदस्त वाढ झाली आहे, जी इक्विटी आणि डेट यांसारख्या इतर प्रमुख मालमत्तांपेक्षा खूपच अधिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याला प्रचंड रिटर्न मिळत आहेत. त्यामुळे लवकरच सोने लवकरच १ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांनी सोन्याच्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय वापरून टप्प्याने गुंतवणूक करण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे.
वाढत्या किमतींमुळे काय घडले?
दागिन्यांची मागणी घटली: विश्व सोने परिषदेच्या (डब्ल्यूजीसी) अहवालानुसार, विक्रमी दरांमुळे सोने दागिन्यांची मागणी मंदावली आहे. ग्राहक किंमत स्थिर होण्याची वाट पाहत आहेत. सोने दर वाढल्यामुळे ग्राहकांकडून जुन्या दागिन्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. २०२५ च्या जानेवारीअखेर, बँकांनी दिलेल्या सोन्यावच्या कर्जामध्ये वार्षिक ७७% वाढ झाली आहे. . ग्राहक वाढत्या सोन्याच्या किमतींचा फायदा घेण्यासाठी त्याचा तारण म्हणून उपयोग करत आहेत.
सोन्याची किंमत सतत कोणत्या कारणांमुळे वाढत आहे?
हे समजून घेण्यासाठी सोन्याच्या किंमतींना चालना देणारे घटक समजून घ्यायला हवेत.
केंद्रीय बँकांची सोने खरेदी केंद्रीय बँकाचा सोन्याच्या बाजारात महत्त्वाचा भाग आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आणि इतर बँकांकडून वाढत्या खरेदीमुळे मागणी वाढून सोन्याची किंमत वाढत आहे.
आर्थिक अनिश्चितता आणि व्यापार युद्धेः अमेरिकेच्या व्यापार धोरणांमुळे आणि संभाव्य व्यापार युद्धांमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत.
भूराजकीय तणाव : मध्यपूर्वेतील अस्थिरता, विशेषतः गाझामधील वाढते हल्ले सोन्याच्या किंमत वाढीसाठी चालना देत आहेत. महागाईची चिंता: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, हवामानविषयक अनिश्चिततेमुळेही महागाईचा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे सोने उच्चांक गाठत आहे.
कपातीच्या अपेक्षा आणि कमजोर डॉलर: अमेरिकेचा डॉलर आणि व्याजदर सोन्याच्या किमतींवर मोठा परिणाम करतात. फेडरल रिझर्व्हने २०२५ अखेरीस दोन व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. यामुळे डॉलर कमकुवत होईल आणि त्यामुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळू शकतो.
गोल्ड ईटीएफवर परिणाम
भारतीय गोल्ड ईटीएफमध्ये फेब्रुवारीतही सकारात्मक गुंतवणूक झाली. जानेवारीच्या विक्रमी पातळीपेक्षा थोडी कमी असली तरी, गुंतवणूकदारांचा सोनेदरातील वाढीबाचत सकारात्मक दृष्टिकोन कायम आहे.
पुढे काय होईल ?
सोन्याच्या झपाट्याने वाढणाऱ्या किमतींमुळे काही प्रमाणात किंमत स्थिर होण्याची शक्यता आहे. मात्र तरीही गुंतवणुकीसाठी मजबूत मागणी, राजकीय आणि आर्थिक अनिश्चितता, महागाई वाढीच्या शक्यता, कमजोर डॉलर याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होउ शकतो.
गुंतवणूकदारांनी आता काय करावे?
दीर्घकालीन गुंतवणूक (७-१० वर्षे) करणाऱ्यांनी १०% ते १५% गुंतवणूक सोन्यात करावी. गोल्ड ईटीएफ हे चांगले पर्याय ठरू शकतात. १०-१५% मर्यादा ओलांडली असेल, तर काही प्रमाणात नफा वसूल करणे योग्य. कमी कालावधीसाठी गुंतवणूक करत असाल तर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक टाळावी.