Join us

Gold: 'सुवर्ण' संधी! सोने घ्या स्वस्तात !! १५ सप्टेंबरपर्यंत खरेदी करा गोल्ड बॉण्ड 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 1:25 PM

Gold: सोने खरेदी आणि सोन्यातील गुंतवणूक हा सर्वकालीन आकर्षक पर्याय आहे. न बुडण्याची भीती आणि खात्रीशीर परतावा यामुळे बहुतांश नागरिक गुंतवणुकीसाठी हाच पर्याय निवडतात.

मुंबई  - सोने खरेदी आणि सोन्यातील गुंतवणूक हा सर्वकालीन आकर्षक पर्याय आहे. न बुडण्याची भीती आणि खात्रीशीर परतावा यामुळे बहुतांश नागरिक गुंतवणुकीसाठी हाच पर्याय निवडतात. हीच मानसिकता लक्षात घेऊन सरकारने चालू वर्षासाठी सोन्यात गुंतवणूक योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. सोमवार, ११ सप्टेंबरपासून शुक्रवार १५ डिसेंबरपर्यंत लोकांना सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमध्ये (एसजीबी) पैसे गुंतविता येतील.

प्रत्येक बॉण्डची इश्यू प्राइस ९९९ कॅरेट सोन्याच्या भावानुसार ठरविली जाते. त्यामुळे एक ग्रॅम सोने म्हणजेच एका गोल्ड बॉण्डची इश्यू प्राइस ५,९२३ रुपये इतकी निश्चित केली आहे. ऑनलाइन खरेदी केल्यास यावर प्रत्येक बॉण्डमागे ५० रुपयांची सूट दिली जाणार आहे. त्यांच्यासाठी ही रक्कम ५,८७३ रुपये इतकी असेल. यात गुंतवणूक केल्यास प्रतितोळा म्हणजे १० ग्रॅममागे ५०० रुपयांची सूट मिळणार आहे. राज्यात सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम ५९,६०० इतके आहेत. म्हणजे राज्यात हे बॉण्ड सुमारे ८०० रुपयांनी स्वस्तात मिळतील.तज्ज्ञ काय सांगतात?कमकुवत जागतिक अर्थव्यवस्थेमुळे सोने हे चांगले, निश्चित रिटर्न देणारी गुंतवणूक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. चलनवाढ व आर्थिक अस्थिरतेविरुद्ध पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. या बॉण्डमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एसजीबी योजनेचा पहिला हप्ता १९ ते २३ जूनला उघडला होता. 

किती दिवसात घेता येईल किती सोने?- ४ किलो इतकेच सोने या योजनेतून घेता येईल. यात यापेक्षा अधिक गुंतवणूक करता येणार नाही.- ८ वर्ष इतक्या मॅच्युरिटी काळानंतर यात गुंतवलेली रक्कम परत मिळेल.-  ५ वर्ष इतक्या काळानंतर बॉण्डमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून बाहेर पडता येईल.

ऑफलाइन पद्धतीने गुंतवणूक शक्य■ कोणत्याही गोल्ड बॉण्ड बँक, स्टॉक एक्स्चेंज बीएसई, एनएसई, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसेच पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करता येईल.■ यासाठी ग्राहकांना केवळ एक अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरून व्यवहार करताच ही रक्कम खात्यातून वजा केली जाईल आणि खरेदी केलेले गोल्ड बॉण्ड तुमच्या डी मॅट खात्यात ट्रान्सफर केले जातील.

गोल्ड बॉण्ड का उत्तम ?

कोणतीही जोखीम नाहीसॉव्हरिन गोल्ड बॉण्ड (एसजीबी) केंद्र सरकारच्या वतीने आरबीआय ग्राहकांना देत असते, त्यामुळे यात बुडीत जाण्याची कोणतीही शक्यता नसते.

२.५ टक्के वार्षिक व्याजएसजीबीमधील गुंतवणुकीवर इश्यू प्राईसवर दरवर्षाला २.५ टक्के इतके व्याज दिले जाते. दर सहा महिन्यांनी व्याज खात्यात जमा केले जाते. व्याजाचा या रकमेवर कर लागत असला तरी यातून टीडीएस कापला जात नाही.

स्वस्तात कर्जएसजीबीमधील गुंतवणुकीच्या आधारे गरज भासल्यास बँकेतून कर्ज काढता येते. पर्सनल लोनसाठी ग्राहकांना १३ ते १४ टक्के इतके व्याज द्यावे लागते. गोल्ड बॉण्डवर घेतलेल्या लोनवर ८ ते ९ टक्के दराने व्याज द्यावे लागते. 

टॅग्स :सोनं