Join us

बजेटनंतर सोन्याला ‘अच्छे दिन’!

By admin | Published: January 25, 2017 12:46 AM

नोटाबंदीमुळे सोन्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे. १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर हा प्रभाव संपेल, असे जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे.

नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे सोन्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे. १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर हा प्रभाव संपेल, असे जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे.जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पी. आर. यांनी सांगितले की, नोटाबंदीच्या काळात नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सोन्याच्या मागणीवर प्रतिकूल परिणाम झाला होता; मात्र आता नागरिकांनी खरेदीला सुरुवात केली आहे. अर्थसंकल्पानंतर हा परिणाम दूर होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. दीर्घकालीन पातळीवर नोटाबंदीचा सोने उद्योगावर अनुकूल परिणाम होईल. काळ्या बाजारावर त्यामुळे नियंत्रण येण्यास मदत होईल. हा उद्योग संघटित व्यवसायाखाली येईल. अर्थात या स्थित्यंतरास काही वेळ लागेल. सोमसुंदरम यांनी म्हटले की, नोटाबंदीच्या काळात दोन कारणांनी व्यवसायावर परिणाम झाला. एक म्हणजे लोक आपल्याकडील जुन्या नोटा बदलून घेण्यात व्यस्त होते. दुसरे म्हणजे, ज्यांना खरोखर सोने खरेदी करायचे होते, त्यांनी उगाच चौकशीची कटकट मागे लागण्याच्या भीतीने खरेदी करणे टाळले.अहवालात म्हटले आहे की, सोने खरेदीवर आणि बाळगण्यावर मर्यादा येणार असल्याच्या अफवा नोटाबंदीच्या काळात पसरल्या होता. त्यातच कर अधिकाऱ्यांनी सोन्या-चांदीच्या काही व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या. त्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले. लग्नासाठी सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनीही खरेदी टाळण्यालाच प्राधान्य त्यामुळे दिले.