डोळे दिपवून टाकणाऱ्या सोन्याचे प्रत्येकालाच आकर्षण. भारतात सोन्याचे दागिने खरेदी करण्याची फार हौस. या दागिन्यांवर आता हॉलमार्किंग करणे बंधनकारक आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, हा यामागचा हेतू आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण... जाणून घेऊया..
सोने-चांदीच्या दागिन्यांचे प्रत्येकालाच आकर्षण असते. भारतात ते जरा जास्तच आहे. लग्न, लहानमोठे सण इत्यादींचे निमित्त साधून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने भेट दिले जातात. भारत हा सर्वाधिक सोने आणि चांदी आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. सोने हे आपल्या अनेक पद्धती व परंपरेचा अविभाज्य भाग आहे. तसेच ते अडचणीच्या दिवसांमध्ये मदतगारही ठरते. म्हणून सोन्यामध्ये अनेक जण गुंतवणूक करताना दिसतात. पण, आपण घेतलेले सोने खरे आहे का? तुम्ही खरे सोने देऊन बनावट सोने खरेदी करत आहात का? हा प्रश्न उद्भवतो. कारण सोन्यात भेसळ करणे खूप सोपे आहे. सामान्य ग्राहक ती भेसळ पकडू शकत नाही. म्हणूनच हॉलमार्किंग भारतात बंधनकारक करण्यात आले आहे. हॉलमार्किंग का आणि कशासाठी, त्याने काय होणार आहे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ ग्राहकंची फसवणूक टाळणे हा एकच हेतू सरकारचा नाही. सोनेखरेदीमागे दरवर्षी हजारो कोटींची करचुकवेगिरी होते. ती रोखण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे.
अनुत्तरित मुद्दे
बहुतांश हॉलमार्किंग केंद्र हे जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे तालुक्यातून तेथे पाठविण्यात येणाऱ्या दागिन्यांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. शुद्धता मोजण्यासाठी केवळ १५ मिनिटे लागतात. मात्र, त्यापुढील प्रक्रिया वेळखाऊ आहे. सर्व प्रकारच्या नोंदी ठेवाव्या लागत असल्यामुळे कधीकधी दागिने परत देण्यास दुसरा दिवसही उजाडू शकतो. अशा वेळी दागिन्याची सुरक्षितता आणि वाहतूकीचा प्रश्न मोठा आहे.
हॉलमार्किंग म्हणजे काय?
सोन्याचा कोणताही दागिना विक्री करण्यापूर्वी त्यावर सरकारमान्य हॉलमार्किंग केंद्राकडून हॉलमार्किंग करून घ्यावे लागते.
सोन्यात १४, १८, २२ आणि
२४ कॅरेट अशा प्रकारच्या
शुद्धता आहेत.
हॉलमार्किंग प्रक्रियेत दागिन्यात सोन्याचे प्रमाण कळते.
२४ कॅरेट सोने खूप मऊ असल्यामुळे त्याचे दागिने बनविले जात नाहीत. बहुतांश दागिने २२ कॅरेटचे असतात.
हॉलमार्किंग का गरजेचे ?
हॉलमार्किंग हे मौल्यवान धातू शुद्धतेचे प्रमाणपत्र आहे. हॉलमार्क सरकारी गॅरंटी आहे. ग्राहकांना नकली माल विकला जाऊ नये आणि व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी हॉलमार्किंग महत्वाचे आहे. पुनर्विक्रीसाठी योग्य मूल्य मिळण्यासाठीही याची मदत हेते. हॉलमार्क होणारा प्रत्येक दागिना हा इरेडियम, रुथेनियम आणि रिनियम हे धातू नसलेला असतो. म्हणून हॉलमार्किंग प्रक्रिया ही सुरक्षित असते
सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणाऱ्या प्रक्रियेतील भट्टीचे
उच्चतम तापमान हे १२०० अंश सेल्सिअस असते.
सोने हा धातू १०५० अंश सेल्सिअस तापमानात वितळतो.
दुसरीकडे, सोन्यातील घातक असलेले इरेडियम, रुथेनियम आणि रिनियम हे धातू १६०० ते १८०० अंश सेल्सिअस तापमानात वितळतात.
हॉलमार्क कशाचा बनतो?
हॉलमार्किंग झालेल्या दागिन्यावर पाच प्रकारचे लोगो असतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दागिन्यांवर हॉलमार्किंग केले जाते
सुरुवात कधीपासून
जुन्या नोंदी पाहिल्यास हॉलमार्किंगला इंग्लंडमधून सुरूवात झाली, असे काही नोंदींमधून आढळते. तिसऱ्या हेन्रीने सोने व चांदीच्या दागिन्यांचे प्रमाणीकरण करण्यास सन १२३८मध्ये प्रयत्न केला. त्यानंतर पहिल्या एडवर्डने सन १३०० मध्ये बिबट्याच्या चेहऱ्यासारखे चिन्ह दागिन्यांवर कोरण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रमाणीकरण आणि हॉलमाार्किंगमध्ये बरेच बदल झाले.
इंग्लंडमध्ये 18व्या शतकात चांदीच्या वस्तुंवर कर आकारण्यास सुरूवात झाली. काही वर्षांनी सोन्याच्या वस्तुंवरही कर लावला. लोकांची फसवणूक करणारे व करचुकवेगिरी करणाऱ्या ज्वेलर्सना चाप बसावा हा यामागे हेतू होता. हॉलमार्किंगमुळे खरेदी आणि विक्रीचे बरेच नेमके आकडे सरकारला मिळतील. त्यामुळे सरकार सहज करचोरी पकडू शकते.
भारतात कधीपासून
भारतात सोन्यच्या दागिन्यांवर सन २००० आणि चांदीच्या दागिन्यांवर सन २००५ पासून सुरुवात झाली. देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंगला सुरूवात झाली असून महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. राज्यात सद्यस्थितीत सुमारे १०० हून अधिक हॉलमार्किंग केंद्र सूरू आहेत. देशभरात १.२७ लाख ज्वेलर्सनी नोंदणी केली आहे.
घरात असलेल्या जुन्या हॉलमार्किंग नसणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांवर या हॉलमार्किंगच्या नियमाचा काहीही परिणाम होणार नाही. भारतात दरवर्षी साधारणत: ७०० ते ८०० मेट्रिक टन सोने आणि ८५०० ते ९००० मेट्रीक टन चांदी आयात होते.
८ हजार कोटींची करचुकवेगिरी
भारतात सुमारे २०० टन सोन्याची तस्करी होते. एका किलोमागे सुमारे ४ लाख रुपयांचा नफा होतो. म्हणजेच दरवर्षी सुमारे ८ हजार कोटी रुपयांची करचुकवेगीरी होते. याकडे सरकारचा डोळा आहे. हॉलमार्किंगद्वारे नेमकी किती दागिन्यांची विक्री होत आहे, याची सरकारकडे आकडेवारीही उपलब्ध होणार आहे. योग्य आकडेवारी मिळाल्यास महसूलातही वाढ होणे सरकारला अपेक्षित आहे.
बेकायदा काही जण इरेडियम, रुथेनियम आणि रिनियम हे धातू वापरतात. हे धातू मानवी आरोग्यास अपायकारक आहेत. त्यातून किरणोत्सर्ग होतो. त्यामुळे सरकारने त्यांच्या भट्टी प्रक्रियेवर बंदी घातली आहे. दागिन्यांच्या हॉलमार्किंगच्या प्रक्रियेत 'एक्सआरएफ प्रोसेस' म्हणजेच दागिन्यांमध्ये कोणते धातू आहेत, हे तपासण्याची प्रक्रिया सर्वात आधी होते. त्या दागिन्यात जर इरेडियम, रुथेनियम किंवा रिनियम हे धातू आढळले, तर तो दागिना हॉलमार्किंग प्रक्रियेसाठी रिजेक्ट केला जातो.