Join us  

GOLD : १ जूनपासून सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग होणार बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 12:21 AM

GOLD : हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र असून सध्या ते ऐच्छिक आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये केंद्र सरकारने एक घोषणा करून १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्क बंधनकारक करण्यात येईल, असे म्हटले होते.

नवी दिल्ली : येत्या १ जून २०२१ पासून सोन्याचे दागिने व इतर वस्तूंसाठी हॉलमार्क बंधनकारक होणार असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र असून सध्या ते ऐच्छिक आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये केंद्र सरकारने एक घोषणा करून १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्क बंधनकारक करण्यात येईल, असे म्हटले होते. हॉलमार्किंग व्यवस्थेत स्थलांतरित होण्यास तसेच भारतीय मानक ब्युरोकडे (बीआयएस) नोंदणी करण्यासाठी व्यावसायिकांना एक वर्षापेक्षाही जास्त मुदत देण्यात आली होती. कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर ही मुदत आणखी वाढवून देण्याची मागणी व्यावसायिकांनी केली होती. त्यानुसार सरकारने आणखी चार महिन्यांची मुदत देऊन हॉलमार्किंगच्या अंमलबजावणीसाठी १ जूनचा मुहूर्त ठरविला.बीआयएसचे महासंचालक प्रमोदकुमार तिवारी यांनी सांगितले की, जूनपासून हॉलमार्किंगची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही तयार आहोत. बीआयएसकडे आतापर्यंत ३४,६४७ ज्वेलरांनी नोंदणी केली आहे. आगामी दोन महिन्यात १ लाख ज्वेलरांची नोंदणी होण्याची अपेक्षा आहे. नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन व स्वयंचलित करण्यात आलेली आहे. १ जूनपासून केवळ १४, १८ आणि २२ कॅरेटच्या सोन्याच्या विक्रीलाच परवानगी असेल.

नोंदणीसाठी उत्साह- ग्राहक व्यवहार सचिव लीना नंदन यांनी एका आभासी पत्रकार परिषदेत सांगितले की, हॉलमार्कच्या अंमलबजावणीसाठी आणखी मुदतवाढ आता कोणीही मागितलेली नाही. - बीआयएसकडे सध्या नोंदणीसाठी उत्साह दिसून येत आहे. ज्वेलरांना हॉलमार्किंगची परवानगी दिली जात आहे.

टॅग्स :सोनंव्यवसाय