Join us

Gold: तुमच्याकडील सोन्याचे दागिने विकण्याचा विचार करताय, अशा प्रकारे मिळवा अधिक पैसे, हे आहेत मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 2:13 PM

Gold jewelry: कोरोनामुळे व्यवसाय बंद झाल्याने नोकरी सुटल्याने अनेक जणांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक नड भागवण्यासाठी अनेक जण सोन्याचे दागिने विकण्याचा विचार करत आहेत.

नवी दिल्ली - अनेकदा असे होते की, अचानक पैशांची आवश्यकता भासते. अशावेळी आपल्याकडे असलेले दागदागिने उपयोगी पडतात. अनेक लोक तातडीने रोख रकमेची आवश्यकता भासल्यावर सोन्याचे दागिने विकण्याचा पर्याय निवडतात. सध्याच्या काळात अशा लोकांचे प्रमाण वाढले आहे. कारण कोरोनामुळे व्यवसाय बंद झाल्याने नोकरी सुटल्याने अनेक जणांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही तुमच्याकडील सोन्याचे दागिने विकण्याचा विचार करत असाल तर हे दागिने विकून चांगली किंमत कशी मिळवता येईल हे जाणून घ्या. ( If you are thinking of selling your gold jewelry, get more money this way, these are the ways)

दागिने विकण्यापूर्वी त्याचे योग्य वजन आमि कॅरेट तपासले पाहिजे. त्यासाठी नेहमी दागिन्याची पावती घेणे चांगले असते. जर तुमच्याकडे पावती नसेल किंवा पावतीवर त्याच्या उल्लेख नसेल. तर तुम्ही आधी कॅरेट मीटर असलेल्या ज्वेलर्सशी संपर्क साधणे योग्य ठरेल. कॅरेटची खातरजमा करण्यासाठी दोन किंवा अधिक ज्वेलर्सकडून तपासणी करणे योग्य ठरेल. जर तुम्ही दागिन्यांच्या शुद्धतेबाबत साशंक असाल तर तुम्ही एक किंवा अधिक कॅरेट मीटर असलेल्या ज्वेलर्सकडून याची तपासणी करू शकता. दागिन्यांवरील हॉलमार्किंग त्याच्या शुद्धतेचे प्रमाणीकरण करते. तसेच खरेदीदार नेहमीच अशा दागिन्यांना पसंती देतो. जर दागिने हॉलमार्किंग असलेले असतील, तर शुद्धता तपासणे सोपे होते. कारण हॉलमार्क स्टॅम्पवर कॅरेटचा उल्लेख असतो. दागिने विकायचे असल्यास जिथून तुम्ही ते खरेदी केलेले असतीत तिथेच विकण्याचा प्रयत्न करा. जे दागिने आपण विक्री केले होते असेच दागिने परत खरेदी केले जातील, असे काही दुकानदारांचे धोरण असते. दागिन्यांच्या विक्रीसाठी अंतिम किंमतीपर्यंत पोहोचण्यापूर्वी ज्वेलर्स वजनातील ठरावीक भाग हा घटवू शकतो. मात्र ज्वेलर्सकडून करण्यात येणाऱ्या घटीकडे लक्ष द्या. काही ज्वेलर्स २० टक्क्यांपर्यंत सोन्यावरची रक्कम कापू शकतो. तसेच दागिन्यामध्ये खडा असल्यास ते अधिक अपव्ययाची गणना करू शकतात. तसेच मेकिंग चार्जेसमध्ये तुम्ही दागिने खरेदी करताना दिलेली रक्कम तुम्हाला परत मिळणार नाही. तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही १० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे दागिने विकत असाल तर ज्वेलर्स केवळ चेकच्या माध्यमातून तुम्हाला पैसे देऊ शकतो. त्यामुळे ज्वेलर्स हा चेकच्या माध्यमातून रक्कम देण्यास सक्षम आहे की नाही याची खातरजमा करून घ्या. तसेच तुम्ही अशी दुकाने आणि सोने खरेदी करणाऱ्यांपासून सावध राहा जे चुकीचा सल्ला देऊन गैरफायदा घेतात. त्यामुळे अशा परिस्थितीत कुठल्यातरी प्रतिष्ठित ब्रँडच्या ज्वेलर्सकचे जाणे हे ऊत्तम पर्याय ठरू शकते. 

टॅग्स :सोनंव्यवसाय