लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे चालू वित्त वर्षाच्या पहिल्या ४ महिन्यांत (एप्रिल-जुलै २०२४) भारताची सोने आयात ४.२३ टक्के घसरून १२.६४ अब्ज डॉलरवर आली. मागच्या वर्षी समान कालावधीत १३.२ अब्ज डॉलरचे सोने आयात झाले होते. प्राप्त आकडेवारीनुसार, सोन्याच्या आयातीतील ही सलग तिसऱ्या महिन्यातील घसरण आहे.
जुलैमध्ये सोने आयात १०.६५ टक्के घसरून ३.१३ अब्ज डॉलरवर आली. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये ती ३.५ अब्ज डॉलर इतकी होती. त्याआधी जूनमध्ये सोने आयात ३८.६६ टक्के आणि मेमध्ये ९.७६ टक्के घटली. एप्रिलमध्ये मात्र आयात वाढून ३.११ अब्ज डॉलर झाली होती. गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये ती १ अब्ज डॉलर होती. ज्ञात असावे की, आयात घटल्यास देशाच्या चालू खात्यातील तूटही (कॅड) घटते.
सरकारने सोने व चांदी यांच्यावरील आयात कर अलीकडेच १५ टक्क्यांवरून घटवून ६ टक्के केला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाल्यामुळे १४ ऑगस्ट रोजी दिल्ली एनसीआरमध्ये सोन्याच्या भावात ३०० रुपयांची वाढ झाली होती. संपूर्ण वित्त वर्ष २०२४ मध्ये सोन्याची आयात ३० टक्के वाढून ४५.५४ अब्ज डॉलर राहिली.
- सणासुदीत मागणी वाढणार
एका ज्वेलरने सांगितले की, सोन्याचे भाव वाढलेले असल्यामुळे चालू वित्त वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत सोने आयात घटली. सप्टेंबरपासून सणासुदीचा हंगाम सुरू होईल. त्याबरोबर सोन्याची मागणी वाढेल. त्यामुळे सोन्याची आयातही वाढेल.