नवी दिल्ली : आॅगस्टमध्ये सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात झाली असली तरीही सप्टेंबरमध्ये ती ४५.६२ टक्क्यांनी घटून २.०५ अब्ज डॉलर झाली. सोन्याची आयात घटल्याने चालू खात्यातील तुटीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.जागतिक आणि स्थानिक बाजारात सोन्याच्या किमती घटल्या आहेत. किमती घटल्याने या मौल्यवान धातूची आयात घटल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात ३.७८ अब्ज डॉलर इतकी होती. भारत हा एक सोन्याचा मोठा आयातदार देश आहे. यंदा जुलै आणि आॅगस्टमध्ये या धातूच्या आयातीत ६२.२ टक्के आणि १४० टक्के वाढ झाली होती. सप्टेंबरमध्ये आयात कमी झाल्याने व्यापार तूट घटून १०.४७ अब्ज डॉलर झाली. यापूर्वी सोन्याची मोठ्या प्रमाणात होत असल्याने चालू खात्यातील तोटा वाढत होता. २०१४-१५ या वित्तीय वर्षात खनिज तेल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूनंतर सर्वाधिक सोन्याची आयात झाली होती. या वर्षात सोन्याची एकूण आयात ३४.३२ अब्ज डॉलर झाली होती. २०१४-१५ मध्ये चालू खात्यातील तूट जीडीपीच्या १.३ टक्के होती. जागतिक स्तरावर सप्टेंबरमध्ये सोन्याची किंमत ०.२ टक्क्यांनी घटून १,१३८.३५ डॉलर प्रतिऔंस झाली.
सप्टेंबरमध्ये सोने आयात ४५.६ टक्क्यांनी घटली
By admin | Published: November 02, 2015 12:09 AM