लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशांतर्गत वाढलेल्या मागणीमुळे नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये देशातील सोन्याच्या आयातीमध्ये २२.५८ टक्क्यांची वाढ झाली आहे. असे असले तरी चांदीच्या आयातीमध्ये मात्र घट झालेली दिसून आली आहे. सोन्याची आयात वाढल्याने देशाच्या आयात-निर्यात व्यापारातील तोटा अजून वाढण्याची शक्यता आहे.
वाणिज्य मंत्रालयाने गत आर्थिक वर्षामध्ये देशात झालेल्या सोने व चांदीच्या आयातीची आकडेवारी जाहीर केली आहे. या वर्षामध्ये ३४.६ अब्ज डॉलर म्हणजेच २.५४ लाख कोटी रुपयांच्या सोन्याची आयात झाली आहे. मागील वर्षापेक्षा यामध्ये २२.५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९-२०मध्ये देशात २८.२३ अब्ज डॉलरची सोने आयात झाली होती.
आर्थिक वर्षामध्ये चांदीच्या आयातीमध्ये मात्र मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. ७९.१ कोटी डॉलरची चांदीची आयात झाली असून आधीच्या वर्षापेक्षा त्यात ७१ टक्क्यांनी घट झाली आहे. सोने-चांदीच्या आयातीमुळे देशाच्या आयात-निर्यात व्यापारामधील तूट वाढत असते. मात्र गतवर्ष हे त्याला अपवाद ठरले आहे. २०१९-२० मध्ये १६१.३० अब्ज डॉलरची असलेली तूट यावेळी कमी होऊन ९८.५६ अब्ज डॉलरवर आली आहे. सोन्याची आयात वाढली तरी चांदीची आयात कमी झाल्यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. सरकारने अर्थसंकल्पामध्ये सोन्यावरील आयातकर १२.५ टक्क्यांवरन १० टक्के केल्यानेही सोन्याच्या मागणीमध्ये थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सर्वाधिक सोने आयात करणारा देश
n भारत हा जगातील सर्वाधिक सोने आयात करणारा देश असून दरवर्षी सुमारे ८०० ते ९०० टन सोन्याची आयात केली जाते. देशातील आभूषण उद्योगाची गरज भागविण्यासाठी मुख्यत: सोन्याची आयात केली जाते. आताही देशांतर्गत मागणी वाढत असल्याने सोन्याची आयात वाढण्यास प्रारंभ झाला आहे. अक्षयतृतीया तसेच लग्नसराईमुळे सोन्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दागिने घडविणारे कारागीर परतले गावी
nजळगाव : दर्जा, शुद्धता, विश्वासार्हता आणि सचोटी या गुणांना कलात्मकतेची जोड देऊन देशभरात सुवर्ण अलंकारांच्या बाबतीत नावलौकिक मिळविण्यासाठी हातभार लावणारे सुवर्णनगरी जळगावातील बंगाली हस्त कारागीर निर्बंधामुळे आपापल्या गावी परतू लागले आहेत. सध्या जळगावात केवळ १० ते १५ टक्केच कारागीर असून ते देखील परत जाण्याची तयारी करत आहे. कारागीर कधी परतणार याची चिंता जळगावातील सुवर्ण व्यवसायासमोर निर्माण झाली आहे.
n१६० वर्षांपूर्वी एक ग्रॅमची अंगठीही तयार स्वरूपात मिळत नव्हती त्या जळगावच्या सराफा बाजारात हजारो प्रकारच्या अत्याधुनिक फॅशनच्या दागिन्यांची उपलब्धता सहजपणे उपलब्ध झाली आहे. अलंकारांची ही घडण करण्यासाठी बंगाली कारागिरांचे हात रात्रंदिवस राबतात. शहरात सहा हजार बंगाली बांधव वास्तव्याला
आहेत.