नवी दिल्ली : आॅगस्ट महिन्यात देशात ३५.५ टन सोन्याची आयात झाली असून, मागील वर्षापेक्षा त्यामध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. सण- उत्सवांचा कालावधी जवळ येत असून, त्यापाठोपाठच लग्नसराईही सुरू होणार आहे. त्यामुळे ही आयात वाढल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र सध्याच्या काळात सोन्याची खरेदी फारशी होत नसताना आयात का वाढली याबाबत चर्चा सुरू आहे.
आॅगस्ट महिन्यात देशामध्ये ३५.५ टन सोन्याची आयात झाली आहे. मागील वर्षीच्या आॅगस्ट महिन्यात १४.८ टनांची आयात झाली होती. याचाच अर्थ यंदा दुपटीहून अधिक आयात देशामध्ये झाली आहे. सध्या सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून, बाजारामध्ये फारसा पैसाही उपलब्ध नाही. त्यामुळे बाजारात ग्राहकही तुरळक आहेत. अशा परिस्थितीत आयात का वाढली ते समजू शकलेले नाही.
मार्च महिन्याच्या अखेरीपासून देशामध्ये लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. यामध्ये सोन्या-चांदीच्या विक्रीचे व्यवहारही बंद होते. आता हळूहळू लॉकडाऊन उठविले जात असून, बाजारातील उलाढाल वाढू लागली आहे. त्यामुळे तसेच आगामी काळात येत असलेले सण आणि उत्सव यामुळे सोन्याच्या खरेदीला आणखी वेग येण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. याशिवाय दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईनिमित्तही सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात असते.
दरवर्षी साधारणपणे सोन्याची मागणी २० टक्क्यांपर्यंत वाढते. मागील वर्षी मात्र सोन्याच्या मागणीत त्यापूर्वीच्या वर्षापेक्षा केवळ १५ टक्के वाढ झाली होती. यंदा २० टक्के वाढ होईल, असे गृहीत धरले तरी देशातील वाढलेली सोन्याची आयात यासाठी खरेदीदार कोण या प्रश्नाचे उत्तर मात्र देऊ शकत नाही.
सध्या पितृपक्ष सुरू असून, त्यामध्ये खरेदी करणे टाळले जाते. अशा स्थितीमध्ये देशातील वाढलेल्या सोन्याच्या आयातीमुळे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
लॉकडाऊन हळूहळू हटविले जात असून, व्यवहारांमध्ये वाढ झाली असली तरी कोरोनाच्या संकटामुळे नोकऱ्यांमध्ये झालेली घट तसेच पगारामध्ये झालेली कपात, वाढलेली महागाई यामुळे सर्वसामान्यांच्या हातात फारसा पैसा शिल्लक नाही. त्यामुळे खरेदी कितपत होणार याबाबत काही व्यापारीच साशंक आहेत. आगामी सणा-सुदीचा काळ, कृषिक्षेत्रात होऊ घातलेले चांगले उत्पादन तसेच लग्नसराई यामुळे लवकरच सोन्याच्या खरेदीला पुन्हा जोर येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
८० टक्के घसरली होती आयात
जानेवारी ते जून या काळामध्ये देशामध्ये होणारी सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात घटली होती. या सहा महिन्यांच्या काळात आयातीमध्ये सुमारे ८० टक्क्यांनी घट झाली होती. लॉकडाऊनच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी सुरू झाली आणि तेथूनच दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली. वायदे बाजारात सोने तेजीत आले.
सोन्याच्या आयातीमध्ये झाली २०० टक्के वाढ, खरेदीदार कोण हे मात्र गुलदस्त्यात
मार्च महिन्याच्या अखेरीपासून देशामध्ये लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. यामध्ये सोन्या-चांदीच्या विक्रीचे व्यवहारही बंद होते.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 05:55 AM2020-09-05T05:55:35+5:302020-09-05T05:56:09+5:30