Join us  

Gold : हॉलमार्क नसलेले दागिने विकणे शक्य, जुने दागिने मोडण्यास नियम लागू नाहीत, नकार दिल्यास होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 6:26 AM

Gold : आता दुकानदार विनाहॉलमार्कचे दागिने विकू शकत नाही. पण ग्राहकांकडील विना हॉलमार्कचे दागिने खरेदी करू शकतात. याचाच अर्थ तुमच्याकडे जुने दागिने असतील तर त्यावर हॉलमार्किंगच्या नव्या नियमांचा कोणताही परिणाम होणार नाही.

नवी दिल्ली : सोन्याच्या दागिन्यांना हॉलमार्कचा नियम लागू झाला असला तरी लोक आपल्याकडील हॉलमार्क नसलेले जुने दागिने दुकानदारांना विकू शकतात. हॉलमार्कच्या नियमांचा त्यात कोणताही अडथळा येणार नाही. भारतात दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. या काळात सोने खरेदी शुभ समजली जाते. अनेकजण जुने दागिने मोडून नवीनही करीत असतात. हॉलमार्किंग नसलेल्या दागिन्यांची खरेदी-विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली असल्यामुळे मोडीच्या सोन्याचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

हॉलमार्क नसल्याने आपल्याकडील सोने दुकानदार घेतील का? घेतले तरी हॉलमार्क नसल्यामुळे त्याला बाजारभाव न लावता कमी किंमत लावतील की काय? यांसारखे प्रश्न लोकांच्या मनात आहेत. तथापि, ज्यांना जुने दागिने मोडून नवीन घडवायचे आहेत, त्यांनी या प्रश्नांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण ग्राहकांकडील जुन्या सोन्याला हॉलमार्किंगचा नियम लागू नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आता दुकानदार विनाहॉलमार्कचे दागिने विकू शकत नाही. पण ग्राहकांकडील विना हॉलमार्कचे दागिने खरेदी करू शकतात. याचाच अर्थ तुमच्याकडे जुने दागिने असतील तर त्यावर हॉलमार्किंगच्या नव्या नियमांचा कोणताही परिणाम होणार नाही. हॉलमार्किंगचा नियम केवळ दुकानदारांकडील सोन्यालाच लागू आहे. याशिवाय दुकानदार जुन्या दागिन्यांचा कस तपासून त्यांना हॉलमार्क करून देऊ शकतात. त्यातून ग्राहकांचा कायमस्वरूपी फायदा होऊ शकतो. 

दुकानदार जुने सोने घेणे नाकारू शकणार नाहीतग्राहक आपल्याकडील जुने सोने मोडण्यासाठी बाजारात जाणार असतील, तर त्या सोन्याचे हॉलमार्किंग करून घेणे बंधनकारक नाही. ग्राहक ते सोने त्याच्या गुणवत्तेच्या आधारे बाजारभावानुसार विकू शकतात. हॉलमार्किंग नाही म्हणून त्याची किंमत कमी होणार नाही. हॉलमार्क नाही म्हणून जुने सोने घेण्यास एखाद्या दुकानदाराने नकार दिल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते. 

टॅग्स :सोनं