मुंबई : सराफा बाजाराने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर चांगलीच उसळी घेतल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. या वर्षी सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर राज्यात ४५० कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल झाल्याची माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनने दिली आहे. गेल्या वर्षी धनत्रयोदशीला सराफा बाजाराने ४०० कोटींचा गल्ला जमवला होता. मात्र त्यानंतर आलेली नोटाबंदी, जीएसटी आणि रेरा कायद्यामुळे बहुतेक मुहूर्तांवर ग्राहकांनी सोने खरेदीकडेही पाठ फिरवली. मात्र धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोने खरेदीला पसंती दिल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे सोने विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास १५ टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितले की, सोने खरेदीसाठी पॅनकार्ड सक्तीची मर्यादा २ लाख रुपयांपर्यंत वाढवल्याचा फायदा घेत धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सराफा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. दस-याला ग्राहकांनी सोने खरेदीत आखडता हात घेतला होता. दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव कमी होण्याची वाट ग्राहक पाहत होते. याआधी दोन वर्षांपूर्वी दिवाळीत सोन्याचा दर कमी असल्याने बाजारात ५०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली होती. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते. त्यात दिवाळीनंतर राज्यात लग्नसराईला सुरुवात होते. म्हणूनच सोनसाखळी, पेडेंट, सोन्याची नाणी यांसोबतच दागिने तयार करून घेण्यासाठी ग्राहकांची लगबग दिसत आहे.
मंगळवारी सोन्याचा भाव प्रति तोळा
२९ हजार ८४० रुपये असतानाही पॅनकार्ड सक्तीची मर्यादा ५० हजारांहून २ लाखांपर्यंत वाढवल्याने महिलांनी मोठ्या संख्येने
खरेदी केली. त्यामुळे लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर बाजाराला आणखी ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
गेल्या सहा वर्षांत धनत्रयोदशीदिनी
असलेले सोन्याचे दर
दिनांक दर (रुपये/तोळा)
१७ आॅक्टोबर २०१७ २९ हजार ८४०
२८ आॅक्टोबर २०१६ ३० हजार ३४०
११ नोव्हेंबर २०१५ २५ हजार ४७१
२३ आॅक्टोबर २०१४ २६ हजार ०००
३ नोव्हेंबर २०१३ २९ हजार ८५८
१३ नोव्हेंबर २०१२ ३१ हजार ६७८
धनत्रयोदशीला सोने चकाकले, सराफा बाजारात उत्साह, राज्यभरात ४५० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल
सराफा बाजाराने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर चांगलीच उसळी घेतल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. या वर्षी सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर राज्यात ४५० कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल झाल्याची माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 05:15 AM2017-10-18T05:15:01+5:302017-10-18T05:15:17+5:30