नवी दिल्ली : देशात आजही अनेक ठिकाणी हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जात आहेत. यासंदर्भात, सरकारने जाहीर केले आहे की, आता वेगवेगळ्या राज्यांतील आणखी १८ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत. दरम्यान, २३ जून २०२१ पासून हॉलमार्किंगचा नियम लागू झाला आहे. आतापर्यंत जवळपास ४० कोटी सोन्याचे दागिने हॉलमार्क करण्यात आले आहेत.
सरकार देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या टप्प्यात यासंबंधी अंमलबजावणी करत आहे. भारत सरकार आता देशाच्या विविध भागात भेसळयुक्त सोन्याच्या दागिन्यांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नियम लागू करत आहे. मात्र, हा नियम देशात २३ जून २०२१ रोजीच करण्यात आला. परंतु, त्याची टप्प्याटप्प्याने विविध जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी सुरू आहे.
सरकारने गुरुवारी ज्या १८ जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी जाहीर केली आहे. त्यामध्ये आंध्र प्रदेश, बिहार, हरयाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, ओडिशा, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आहेत. याचबरोबर, आता देशात ३६२ असे जिल्हे आहेत, जेथे हॉलमार्किंगशिवाय दागिने आणि सोन्याच्या कलाकृती दागिन्यांच्या दुकानात विकल्या जाणार नाहीत.
रजिस्ट्रर ज्वेलर्सची संख्या वाढली
सरकार आता देशातील ज्वेलर्सच्या रजिस्ट्रेशनवर काम करत आहे. यामुळेच देशात रजिस्ट्रर ज्वेलर्सची संख्या पूर्वीपेक्षा खूप वाढली आहे. पूर्वी रजिस्ट्रर ज्वेलर्सची संख्या केवळ ३४, ६४७ होती, ती आता १,९४,०३९ झाली आहे. याशिवाय, हॉलमार्किंग केंद्रांची संख्याही ९४५ वरून १,६२२ झाली आहे.
ॲपद्वारे तुम्ही हॉलमार्क केलेले सोने ओळखू शकता
जर तुमच्याकडे कोणतेही दागिने आहेत आणि त्यावर हॉलमार्क केलेले आहे.मात्र, ते योग्य हॉलमार्किंग आहे की नाही, याबद्दल तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही बीआयएस केअर मोबाइल ॲपद्वारे ते ओळखू शकता. दरम्यान, या ॲपचा वापर करून, ग्राहक हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सत्यता पडताळू शकतो आणि उत्पादनाच्या गुणवत्तेबद्दल किंवा बीआयएस मार्कच्या गैरवापराबद्दल त्याची तक्रार देखील नोंदवू शकतो.