लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सोने आणि दिवाळी यांचा जवळचा संबंध आहे. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते. तसेच दिवाळीनिमित्त सोन्यामध्ये मोठी उलाढाल होते. यंदा त्या मानाने कमी असलेले सोन्याचे दर आणि आगामी लग्नसराईमुळे वाढलेली मागणी याचा परिणाम म्हणून दिवाळीत सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च, २०२० मध्ये केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका सराफ आणि दागिने बनविण्याच्या व्यवसायाला बसला आहे. मागील वर्षीच्या दिवाळीमध्ये कोरोनाचे निर्बंध बऱ्याच प्रमाणात कायम असल्याने फारशी खरेदी झाली नव्हती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे मिळत असलेले संकेत आणि काेरोनाचे जवळपास संपलेले निर्बंध यामुळे यंदाची दिवाळी मोठ्या प्रमाणात सोने खरेदीची शक्यता आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून विवाह स्थगित झाले आहेत. ते येत्या काळामध्ये होणार असल्यामुळे दागिन्यांची खरेदी वाढू शकते.
कोरोनाच्या लसीकरणाचा वाढत असलेला वेग आणि कमी होणारी रुग्णसंख्या विचारात घेता सरकारनेही निर्बंध कमी केले आहेत. त्याचप्रमाणे खाली आलेल्या सोन्याच्या दरांमुळेही खरेदीसाठी ग्राहक पुढे येण्याची शक्यता आहे.
जीएसटी संकलनावरून अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे. लग्नसराईमुळे दागिन्यांना मागणी वाढणार आहे.
- आशिष पेठे, चेअरमन,
रत्ने व दागिने निर्यात संवर्धन परिषद
पितृपक्ष संपल्यापासूनच बाजारात तेजी आहे. त्याचप्रमाणे नवरात्रापासूनच ग्राहकांची संख्या वाढत आहे.
- सौरभ गाडगीळ,
चेअरमन, पीएनजी ज्वेलर्स
गेल्या वर्षभरापासून कमी मागणी असल्यामुळे यंदाच्या धनत्रयोदशीला दागिने तसेच सोन्याची चांगली विक्री होईल, अशी अपेक्षा आहे. ३० टक्क्यांनी विक्री वाढू शकेल.
- अहमद एमपी, चेअरमन,
मालाबार गोल्ड ॲण्ड डायमंडस