जळगाव/मुंबई : नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीपासून मागणी वाढत असल्याने सोन्याच्या भावात दोन दिवसात ९०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोने ४८ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. विजयादशमीपूर्वी खरेदी वाढल्याने सोन्याला ही झळाळी मिळाली आहे. गेल्या दोन दिवसांत चांदीही ६४ हजारांवर गेली आहे.सप्टेबरच्या मध्यापासून घसरण होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात पितृपक्ष संपल्यानंतर वाढ सुरू झाली. पितृपक्ष संपताना सोने ४७ हजार ५०० रुपये तोळा, तर चांदी ६२ हजार ३०० रुपये किलो होती. नवरात्र सुरु झाल्यानंतर ८ ऑक्टोबरपासून सोन्याच्या भावात वाढ सुरू झाली. त्या दिवशी सोने ४७ हजार ८०० रुपये झाले. दुसऱ्या दिवशी, ९ ऑक्टोबरला त्यात १०० रुपयांची वाढ झाली. १३ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ होऊन ते ४८ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आज, गुरुवारी सोन्याच्या भावात पुन्हा ३०० रुपयांची वाढ झाली. चांदीच्या भावातही ८ ऑक्टोबर रोजी वाढ झाली आणि ती ६२ हजार ५०० रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात ८०० रुपयांची वाढ झाली. १२ ऑक्टोबरला चांदी ५०० रुपयांनी महागली, तर बुधवारी एक हजार रुपयांची वाढ होऊन चांदी ६४ हजार ८०० रुपये वर पोहोचली. गुरुवारी मात्र चांदीच्या दरामध्ये ६०० रुपयांची घसरण झाली आणि ती ६४ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर स्थिरावली.
दिवाळीपर्यंत कल कायमnनवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून सुवर्ण बाजारात मोठा उत्साह आहे. सोने-चांदी खरेदी वाढली असून, दोन दिवसांत तर अधिकच ग्राहक सोने व चांदीकडे वळत आहेत, असे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. nविजयादशमीच्या पूर्वीच अस्सल सोन्याची एक प्रकारे लयलूट सुरू असून हा उत्साह दिवाळीपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.