नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांनंतर शनिवार, १ ऑगस्ट रोजी ९०० रुपयांनी घसरण झालेल्या सोन्याच्या भावात सोमवार, ३ ऑगस्ट रोजी सुवर्णबाजार उघडताच पुन्हा ७०० रुपयांनी वाढ होऊन ते ५४,७०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. अशाच प्रकारे चांदीतही ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ६६,५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. अमेरिकन डॉलरचे दर वाढून ते ७५.२८ रुपयांवर पोहोचल्याने ही भाववाढ होत तर आहे, सोबतच दलालांमार्फतही सुवर्णबाजारात अस्थिरता निर्माण केली जात असल्याने सतत भाव कमी जास्त होत असल्याचे सांगितले जात आहे.
भाव अचानक कमी-जास्त
कोरोनाच्या संकटात सातत्याने सोने-चांदीच्या भावात वाढ होत आहे. मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून ते अचानक कमी तर कधी जास्त होत आहे. सोने वाढले तर चांदीचे भाव कमी होतात व चांदी वाढली तर सोन्याचे भाव कमी होत असल्याचे चित्र आहे. दलालांमार्फत ही अस्थिरता निर्माण केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. अशाच प्रकारे बुधवार, २९ एकाच दिवसात सोन्याच्या भावात १४०० रुपयांनी वाढ होऊन सोने ५४ हजार ९०० रुपये प्रति तोळावर पोहचले होते. त्यावेळी मात्र ६७, ५०० रुपयांवर असलेल्या चांदीत १३०० रुपयांनी घसरण होऊन ती ६६ हजार २०० रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर शुक्रवारी, ३१ जुलै रोजी पुन्हा १२०० रुपयांनी घसरण झाली व ती ६५ हजार रुपयांवर आली. शनिवार, १ ऑगस्ट रोजी चांदीत पुन्हा १००० रुपयांनी वाढ होऊन चांदी ६६,००० रुपयांवर पोहचली, मात्र त्या वेळी सोन्याच्या भावात ९०० रुपयांनी घसरण होऊन ते ५४,००० रुपये प्रति तोळ््यावर आले.
डॉलरचे दर वाढल्याने पुन्हा वाढ
सोमवारी सुवर्णबाजार सुरू होताच सोने व चांदी या दोन्हीमध्ये भाववाढ झाली. अमेरिकन डॉलर ७५.२८ रुपयांवर पोहोचले. त्यामुळे शनिवार, १ ऑगस्ट रोजी ९०० रुपयांनी घसरण झालेल्या सोन्याच्या भावात पुन्हा ७०० रुपयांनी वाढ होऊन ते ५४ हजार ७०० रुपयांवर पोहोचले. चांदीतही ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ६६ हजार ५००रुपयांवर पोहोचली.
जागतिक पातळीवर बँकांनी व्याजदर कमी केल्याने सोन्यात गुंतवणूक वाढून मोठी मागणी वाढली आहे. दलालांच्या सक्रीयतेने अस्थिरता निर्माण होऊन भाव कमी-जास्त होत असताना आता अमेरिकन डॉलरचे दरही वाढल्याने सोने-चांदीचे भाव पुन्हा वाढले आहे.
- स्वरूप लुंकड, सराफ व्यापारी