नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजी आणि लग्नसराईसाठी ज्वेलरांनी केलेली जोरदार खरेदी या बळावर राजधानी दिल्लीत गुरुवारी सोने ३१ हजार रुपयांवर गेले. चांदीच्या भावात ४0 रुपयांची घसरण झाली. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोने सलग सहाव्या सत्रात वाढले.शेअर बाजारात सात दिवसांत सहाव्यांदा घसरण झाल्यामुळे सराफा बाजार तेजीत आला. सिंगापुरातील बाजारात सोने 0.३९ टक्क्यांनी वाढून १,३0१.५0 डॉलर प्रति औंस झाले. काल येथे सोने १,३0८.0२ डॉलरपर्यंत वर चढले होते. हा चार आठवड्यांचा उच्चांक झाला होता. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ५0 रुपयांनी वाढून अनुक्रमे ३१,000 रुपये आणि ३0,८५0 रुपये प्रति तोळा झाला. गेल्या दोन दिवसांत सोने ३00 रुपयांनी वाढले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २00 रुपयांनी वाढून २४,६00 रुपये प्रति नग झाला. दिल्लीत तयार चांदीचा भाव मात्र, ४0 रुपये घसरून ४४,0६0 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीची चांदी १0५ रुपये घसरून ४३,६२0 रुपये किलो झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने ३१ हजारांवर, चांदी मात्र घसरली
By admin | Published: November 04, 2016 5:59 AM