Gold Rate Down, 13 march 2021: लग्नसराईचा मोसम सुरू झाला की सोनं खरेदीचाही ओघ वाढतो. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून ते आतापर्यंतचे सोन्याचे दर पाहता तब्बल ११ हजार रुपयांची घट झाली आहे. आता एप्रिल महिन्यापासून लग्नसराईचा मोसम सुरू होईल. यात तुमच्या घरी देखील सनई-चौघडे वाजणार असतील आणि सोनं खरेदीचा बेत असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण एकाच महिन्यात गेल्या १३ दिवसांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल २ हजार २३८ रुपयांची घट नोंदवली गेली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरातील घट अशीच सुरू राहील अशी अटकळ बांधण्यात येत आहे. जाणकारांच्या अंदाजानुसार येत्या काळात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ४२ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. (Gold Price Become More Cheaper In Wedding Season)
मार्चमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण
फक्त मार्च महिन्याची आकडेवारी पाहता सोन्याच्या दरात आतापर्यंत २,२३८ रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. तर जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत ५,८७० रुपयांची घट झाली आहे. सोन्याची किंमत सध्या त्याच्या सर्वाधिक किमतीपेक्षा ११ हजार ९२२ रुपयांनी खाली उतरली आहे.
४२ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली उतरणार किंमत
केडिया कमॉडिटीचे एमडी अजय केडिया यांच्या माहितीनुसार सोन्याच्या किंमतीत घट होण्यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात २.५ टक्क्यांची घट करण्यात आल्याच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीच्या दरांत मोठी घट झाली. तर गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार नफेखोरी झाल्याचं सांगण्यात येत आहे. केडिया यांच्या माहितीनुसार येत्या काळात सोन्याची प्रति १० ग्रॅमसाठीची किंमत ४२,५०० रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.