Join us

Gold Price : चीनमुळे वाढतेय सोन्याची किंमत! 'या' कारणामुळे गोल्डचा साठा वाढवतोय ड्रॅगन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:14 IST

Gold Price : भारताचा शेजारी देश चीन सातत्यानं सीमावादामुळे चर्चेत होता. परंतु, सध्या सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळेही चीन चर्चेत आहे.

भारताचा शेजारी देश चीन सातत्यानं सीमावादामुळे चर्चेत होता. परंतु, सध्या सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळेही चीन चर्चेत आहे. दिल्लीत मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. ९९.९ टक्के शुद्धतेचं सोनं ८२० रुपयांनी वधारून ७९,७८० रुपये प्रति १० ग्रॅम झालं. तर ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव ७९,३८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीचा भावही १,००० रुपयांनी वधारून ९४,८५० रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे.

चीन मोठं कारण

चीनच्या मध्यवर्ती बँकेनं (पीबीओसी) तब्बल सहा महिन्यांनंतर सोनं खरेदी सुरू केली आहे. २०२३ मध्ये चीनने जगातील सर्वात जास्त सोन्याची खरेदी केली. पीबीओसीच्या खरेदीमुळे चीनमध्ये सोन्याची मागणी वाढेल, ज्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवरही होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे. चीनच्या आयातीवरील शुल्क अमेरिका वाढवण्याच्या शक्यतेशीही या पावलाचा संबंध जोडला जात असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ट्रम्प प्रशासनाच्या काळात चीन शुल्काची भरपाई करण्यासाठी सोन्याचा वापर करू शकतो.

आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी

जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. कॉमेक्स सोन्याचा वायदा १५.२० डॉलरने वधारून २,७०१ डॉलर प्रति औंस झाला. आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्येही सोनं त्याच पातळीवर व्यवहार करत होतं. चांदीच्या दरात मात्र किंचित घसरण झाली आणि तो ३२.५५ डॉलर प्रति औंसपर्यंत घसरला.

म्हणून दरात वाढ

फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात केलेली संभाव्य कपात आणि चीनच्या सक्रियतेमुळे सराफा बाजाराला आधार मिळाला आहे. शिवाय, अमेरिकेतून बिगरशेती उत्पादकतेची आकडेवारी आल्यानंतर बाजारात आणखी बदल होऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीमुळे सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे.

टॅग्स :चीनसोनं