नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत होती. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या वाढत्या दरांमुळे अनेकांना चिंतेनं ग्रासलं होतं. परंतु आता सोन्याचे दर घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वाढल्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या भावात प्रति तोळा 131 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधीच सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.सोन्याबाबत पॉलिसी राबवण्याच्या विचारात आहे. ज्यामुळे सोन्यामधील गुंतवणुकीच्या व्यवहारात पारदर्शकता येईल. त्याचप्रमाणे 2020मध्ये सोन्याची मागणी 700 ते 800 टन राहण्याची शक्यता आहे, असं World Gold Councilच्या भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पीआर यांनी सांगितलं. तसेच केंद्र सरकारने 15 जानेवारी 2020पासून सोन्यावर हॉलमार्क असणं अनिवार्य केलं आहे. दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी (31 जानेवारी, 2020) सोन्याची किंमत प्रतितोळा 41 हजार 584 रुपयांवरून 41 हजार 453 रुपयांपर्यंत घसरली. गुरुवारी सोन्याचे भाव 400 रुपयांनी वाढले होते, तर बुधवारी मात्र सोन्याच्या दरात घसरण झाली होती. दुसरीकडे चांदीचे दर वाढतेच आहेत. चांदीच्या दरात प्रति किलो 89 रुपयांनी वाढ झाली आहे. गुरुवारीही चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. गुरुवारी चांदीचे दर 737 रुपयांनी वाढले होते.
खूशखबर! सोन्याच्या किमती घसरल्या, दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची चांदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 6:42 PM