गेल्या काही वर्षांत सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकट हे त्यामागील प्रमुख कारण आहे. अमेरिकेत एकापाठोपाठ एक बँका बंद पडल्यानं संपूर्ण जागतिक बाजारपेठेत आर्थिक मंदीची भीती आणखीनच वाढलीये. मंदीच्या भीतीनं शेअर बाजारावर भीतीचं सावट आहे. याच संकटकाळात सोन्याच्या किंमतीला सपोर्ट मिळाला आणि त्याच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्या.
जेव्हा आर्थिक संकट येतं तेव्हा जगभरातील मध्यवर्ती बँका सोनं खरेदी करण्यास सुरुवात करतात. यावेळीही असंच काहीसं घडलंय. एक काळ असा होता जेव्हा भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत फक्त 111 रुपये होती. मात्र आज सोन्याच्या भावानं 60 हजार रुपयांचा आकडा पार केलाय.
६३ वर्षांत असे वाढले दर
1960 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 111 रुपये होती. त्यानंतर सातत्यानं सोन्याच्या दरात तेजी येत गेली. पाहा कसे वाढत गेले दर...
1960 | 10 ग्राम | 111 रुपये |
1970 | 10 ग्राम | 184 रुपये |
1980 | 10 ग्राम | 1330 रुपये |
1990 | 10 ग्राम | 3200 रुपये |
2000 | 10 ग्राम | 4400 रुपये |
2005 | 10 ग्राम | 7000 रुपये |
2010 | 10 ग्राम | 18500 रुपये |
2015 | 10 ग्राम | 26343 रुपये |
2020 | 10 ग्राम | 48615 रुपये |
2022 | 10 ग्राम | 59300 रुपये |
2023 | 10 ग्राम | 63185 रुपये |
का वाढल्या किंमती?
सध्या सोन्याच्या दरात झालेल्या वाढीचं कारण अमेरिका आणि इतर देशांमध्ये बँकिंग संकट, कमकुवत डॉलर, सेफ हेवन डिमांड आणि शेअर बाजारातील अनिश्चिततेची परिस्थिती असल्याचं बाजारातील जाणकारांचं म्हणणं आहे. जागतिक शेअर बाजारात चढ-उतार सुरूच आहेत. चलनातील कमजोरीमुळे मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी वाढवली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियादेखील तेच करत आहे.
स्वातंत्र्याच्या वेळी किंमत किती?
इंडियन पोस्ट गोल्ड कॉइन सर्व्हिसेसकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा 10 ग्रॅम सोन्याची किंमत 88.62 रुपये होती. यानंतर सोन्याचे भाव झपाट्याने वाढू लागले.
दरम्यान, जागतिक स्तरावर झालेल्या घसरणींनंतर दिल्लीतील सर्राफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात 350 रुपयांची घसरण झाली. यानंतर सोन्याचे दर 60170 रुपये प्रति 10 ग्राम झाले. गेल्या कामकाजाच्या सत्रात सोन्याचे दर 60520 रुपयांवर बंद झाले होते.