Gold Price Outlook: या वर्षी सोन्या-चांदीच्या दरात सर्वाधिक वाढ झाली असून सातत्यानं नवनवीन विक्रम होत आहेत. सोन्यानं ८१,००० रुपयांचा टप्पा ओलांडला असून चांदीही एक लाख रुपयांवर पोहोचली आहे. तेजीचा हा काळ असाच कायम राहिल्यास पुढील दिवाळीपर्यंत सोनं एक लाखांपर्यंत पोहोचू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही मोठी तेजी येऊ शकते असं म्हणत याची किंमत सव्वा ते १.३० लाखांची पातळी गाठू शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
त्यामुळे येत्या वर्षभरात चांदीच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. चांदीचे दर १.२४ लाख ते १.३० लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात. त्याचबरोबर सोनं २० टक्क्यांहून अधिक परतावाही देऊ शकते.
चांदीत सर्वाधिक तेजी राहण्याची शक्यता
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या रिपोर्टनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून नफा देण्यात चांदीनं सोन्याला मागे टाकत आहे. २०२४ मध्ये चांदीनं आतापर्यंतचा सर्वाधिक ४० टक्के परतावा दिला आहे. आगामी वर्षातही चांदीची कामगिरी सोन्यापेक्षा चांगली होऊ शकते. येत्या १२ ते १५ महिन्यांत चांदीचे दर १,२५,००० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात, असा कंपनीचा अंदाज आहे.
२०१६ पासून सोनं सातत्यानं तेजीत असून सकारात्मक कल कायम ठेवून आहे. याची किंमत मध्यम मुदतीत ती ८५ हजार रुपये आणि दीर्घ मुदतीत एक लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. २०१९ मध्ये दिवाळीत सोनं खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना या वर्षीपर्यंत जवळपास १०३ टक्के नफा झाला आहे. म्हणजे त्यांचे पैसे दुपटीहून अधिक झाले आहेत. यंदा सोन्यानं ३३ टक्के परतावा दिला आहे, जो गेल्या ४५ वर्षांतील सर्वाधिक परतावा आहे.
घसरणीदरम्यान खरेदीची संधी
सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत राहील, पण त्यातही काही काळासाठी थोडी घसरण दिसून येईल, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तिमाही रिपोर्टनुसार त्यांच्या किमतींमध्ये ५ ते ७ टक्क्यांची करेक्शन होऊ शकते. गुंतवणुकीसाठी ही चांगली संधी असेल आणि गुंतवणूकदार त्यावेळी खरेदी करू शकतील.