मुंबई - सोने-चांदीच्या भावात मंगळवारी जोरदार घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. एमसीएक्स एक्सचेंजच्या माहितीनुसार सोन्याच्या दरात ५८४ रुपयांची घसरण झाली आहे त्यामुळे प्रतितोळा ४२ हजार ९३६ रुपयांवर सोन्याचे भाव आले आहेत.
वायदे बाजारात (एमसीएक्स) सोन्याचे दर १.३४ टक्क्यांनी - म्हणजेच ५८४ रुपयांनी घसरले. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याची किंमत ४२,९९६ रुपयांवर आली आहे. गेले पाच दिवस वायदे बाजारात सोन्याचे दर वधारत गेले होते आणि त्यांनी नवा उच्चांक गाठला होता. सोन्याचा एक तोळ्याचा भाव ४३,७८८ रुपयांवर जाऊन पोहोचला होता. त्यात आज काहीशी घसरण पाहायला मिळाली. चांदीचे दरही १.६ टक्क्यांनी घसरले असून वायदे बाजारात एक किलो चांदीची किंमत ४८,५८० रुपये आहे.
सोन्याच्या वाढलेल्या किंमती पाहून गुंतवणूकदारांनी 'प्रॉफिट बुकिंग'ला पसंती दिल्यानं दर खाली आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसच्या प्रकरणात वाढ झाल्याने सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ झाल्याचं दिसतं. जागतिक स्तरावरील सोन्याच्या किंमती मागील सात वर्षाच्या उच्चांकापर्यंत पोहचल्या आहेत तर भारतात सोन्याच्या किंमती कायम वाढत असल्याचे दिसून येतं.
भारतीय रुपयात सातत्याने घसरण होत असल्याचे विदेशातील शेअर बाजारही गडगडत चालले. मागील १० दिवसांत तब्बल २ हजार १०० रुपयांनी सोनं महागलं होतं तर चांदीच्या दरात ३ हजारांनी वाढ झाली होती. चीनमधील कोरोना व्हायरस, अमेरिका-इराणमधील तणाव यामुळे सोने-चांदीत गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण होत असल्याने सोने-चांदीच्या भावात वाढ होत असते. मागील दीड महिन्यात सोन्याचे दराने नवीन उच्चांक गाठला होता. २० फेब्रुवारीला सोन्याचा दर ४२ हजार रुपये होता, तर २२ फेब्रुवारीला हा दर ४३ हजार रुपयांपर्यंत पोहचला.