जळगाव : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण, तसेच रशिया आणि चीनने सोन्याची वाढविलेली खरेदी, यामुळे सोन्याचे भाव नव्या उच्चांकावर पोहोचून ते ३६ हजार ५०० रुपये प्रती तोळा झाले आहे. चांदीचे भाव मात्र स्थिर आहेत.
सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी, तसेच अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या भावाचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी-जास्त होत असतात. सध्या रशिया व चीन या दोन्ही देशांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वधारले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची खरेदी वाढत असतानाच, त्यात भरात भर म्हणजे भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे गेल्या सहा वर्षांतील एकाच वेळी (एक रुपया १० पैसे) वाढलेले भावही कारणीभूत ठरत आहे. ५ ऑगस्ट रोजी ६९.६५ रुपयांवर असलेले डॉलरचे भाव ६ रोजी ७०.७५ रुपयांवर पोहोचले. त्यामुळे सोन्याचेही भाव थेट ७०० रुपये प्रती तोळ्याने वाढले. ३५ हजार ८०० रुपये प्रती तोळा असलेले सोने वरील सर्व कारणांमुळे थेट ३६ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, वस्तू व सेवा कर (जीएसटी) मिळून एक तोळा सोन्यासाठी ग्राहकांना ३७ हजार ३०० रुपये मोजावे लागत आहेत.
‘ऑफ सिझन’मध्ये मोठी वाढ
यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची तस्करी वाढून दलालांकडून सोन्यात कृत्रिम मागणी वाढली व जून महिन्याच्या शेवटी सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ्यावर पोहचले. त्यानंतरही भाववाढ अशीच सुरू राहून ११ जुलै रोजी सोने ३५ हजार रुपयांवर पोहोचले होते. ही भाववाढ कमी न होता कायम राहत एक महिन्याच्या आतच सोन्यामध्ये दीड हजार रुपये प्रती तोळ्याने वाढ होऊन ते आता ३६ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे. सहा वर्षांपूर्वी सोने ३५ हजारावर पोहोचले होते. त्यानंतर, ते खाली आले होते व पुन्हा या वर्षी फेब्रुवारी, २०१९मध्ये ते ३५ हजारावर पोहोचले होते.
सोन्याच्या किमतीने गाठला ३६,५०० रुपयांचा नवा उच्चांक
चांदीचे भाव मात्र स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 04:06 AM2019-08-07T04:06:01+5:302019-08-07T06:50:10+5:30