Join us  

Gold Price Review: सोनं ₹९२७१ आणि चांदी ₹११८४३ नं वाढली, Gold होणार का ८० हजारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 12:05 PM

सोने आणि चांदीच्या किमती सध्या आवाक्याबाहेर जात आहेत. सोमवारी सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची सरासरी किंमत ७१२७९ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचली. ही आजवरची उच्चांकी किंमत आहे.

Gold Price Review: सोने आणि चांदीच्या किमती सध्या आवाक्याबाहेर जात आहेत. सोमवारी सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची सरासरी किंमत ७१२७९ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचली. ही आजवरची उच्चांकी किंमत आहे. तर चांदीनेही किलोमागे ८१४९६ रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे. अवघ्या एका महिन्यात सोनं ६२३० रुपयांनी महागलं. तर दीड महिन्यात त्यात ९००० रुपयांनी वाढ झाली. 

सोन्याचा भाव ७५ हजारांवर आल्यानंतर त्यात करेक्शन दिसून येईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.१ एप्रिल २०२१ रोजी सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत ४४९१९ रुपये प्रति १० ग्रॅम या दरावर बंद झाली. सोमवार, ८ एप्रिल २०२४ पर्यंत सोन्यानं ७१२७९ रुपयांचा उच्चांक गाठला. दुसरीकडे, जर आपण चांदीबद्दल बोललो, तर या तीन वर्षांत त्याची किंमत १७७५९ रुपयांनी वाढून ६३७३७ रुपये प्रति किलोवरून ८१४९६ रुपये झाली आहे. 

दीड महिन्यात सोनं ९२७१ रुपयांनी वाढलं 

२३ फेब्रुवारी २०२४ रोजी सोन्याचा भाव ६२००८ रुपये प्रति १० ग्रॅम होता. IBJA ने जाहीर केलेल्या दरानुसार सोमवारी सोनं ७१२७९ रुपयांवर बंद झालं. अवघ्या दीड महिन्यात सोनं ९२७१ रुपये प्रति १० ग्रॅमनं महागलं आहे. तर चांदीच्या दरात प्रतिकिलो ११८४३ रुपयांची वाढ झाली. २३ फेब्रुवारीला चांदीचा प्रति किलोचा दर ६९६५३ रुपये होता. 

का वाढतेय किंमत? 

केंद्रीय बँकांची खरेदी - चीनच्या सेंट्रल बँकेने आपल्या विदेशी मालमत्तेमध्ये विविधता आणण्यासाठी सलग १६ महिने सोनं खरेदी केलं आहे, असं WGC च्या ताज्या डेटावरून दिसून आलं आहे. दुसरीकडे, आरबीआयने जानेवारीमध्ये ८,७०० किलो सोनं खरेदी केलं. ही जवळपास १८ महिन्यांतील सर्वात मोठी मासिक खरेदी आहे. 

भू राजकीय तणाव -  विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार पश्चिम आशियातील अलीकडील भू-राजकीय तणाव हे मौल्यवान धातूंच्या किमती वाढण्याचे एक कारण आहे. सोनं हे अनिश्चित आर्थिक परिस्थितीपासून संरक्षणाचं साधन मानलं जातं. सुरक्षित गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले जातं. 

रुपयाची घसरण - विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार सोन्याच्या किमती वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाची नुकतीच झालेली घसरण. गेल्या आठवड्यात रुपया ८३.४५ प्रति डॉलरच्या पातळीवर पोहोचला होता. भारत हा मोठ्या प्रमाणात सोन्याचा निव्वळ आयात करणारा देश असल्यानं, रुपयातील कोणतीही घसरण देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत वाढवते. 

टॅग्स :सोनंगुंतवणूक