जळगाव : भारत-चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीमुळे सोने-चांदीच्या भावावर परिणाम होत असून शनिवारी सोन्याच्या भावात एकाच दिवसात थेट ७०० रुपये प्रति तोळ्याने वाढ होऊन ते ४८ हजार ७०० रुपयांवर पोहचले आहे. सोन्याने ही नवी उच्चांकी गाठली असून चांदीतही एक हजार रुपयांनी वाढ होऊन ती ५० हजार रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. सीमेवर युद्धजन्य स्थिती राहिली तर सोने व चांदी ५० हजाराचा पल्ला ओलांडू शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे. सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरचे दर यांचा मोठा परिणाम होत असतो. यात आता भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने सोने-चांदीचे भाव वधारत आहेत. त्यात कोरोनामुळे विदेशातून होणारी आवकही कमी असल्याने अधिक परिणाम जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे.
११ दिवसात एक हजार ९०० रुपयांनी वाढदोन आठवड्यांपासून सोन्याचे भाव वाढतच असून गेल्या ११ दिवसात तर सोन्याच्या भावात १ एक हजार ९०० रुपयांनी वाढ झाली आहे. यात ९ जून रोजी ४६,८०० रुपयांवर असलेले सोने ११ रोजी ४७,२००, १५ जून रोजी ४७,८०० रुपयावर पोहचले. त्यानंतर बुधवार, १७ जून रोजी सोन्याने ४८ हजार रुपयांचा टप्पा गाठला. तीन दिवस याच भावावर सोने स्थिर होते. मात्र भारत-चीन सीमेवर तणाव वाढतच असल्याने त्याचा परिणाम होऊन शनिवार, २० जून रोजी सोन्याच्या भावात थेट ७०० रुपयांनी वाढ होऊन ते ४८ हजार ७०० रुपयांवर पोहचले आहे. सोन्याच्या भावातील आतापर्यंतची ही नवी उच्चांकी असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. तसे पाहता लॉकडाऊनमुळे सुवर्णबाजार बंद असताना कमॉडिटी बाजारात सोने ४९ हजार रुपये प्रति तोळ््यापर्यंत पोहचले होते. मात्र प्रत्यक्ष सुवर्ण बाजारातील ही नवी उच्चांकी मानली जात आहे.
चांदीतही एक हजाराने वाढसोन्या सोबतच चांदीच्याही भावात शनिवार, २० जून रोजी भाववाढ झाली. एकाच दिवसात चांदी एक हजार रुपयांनी वधारली असून दोन आठवड्यानंतर ती पुन्हा ५० हजार रुपये प्रति तोळ््यावर पोहचली आहे. ५ जून रोजी सुवर्णबाजार सुरू झाला त्या वेळी चांदी ५० हजारांवर होती. मात्र ६ रोजी त्यात दीड हजार रुपयांनी घसरण होऊन ती ४८,५०० रुपयांवर आली. ९ रोजी पुन्हा ४९ हजारावर पोहचलेल्या चांदीच्या भावात १५ जून रोजी एक हजाराने घसरण होऊन ४८ हजारावर आली. मात्र १७ रोजी त्यात पुन्हा थेट एक हजाराने ती ४९ हजार रुपये प्रति किलो वर पोहचली होती. आता शनिवार, २० जून रोजी त्यात एक हजार रुपये प्रति किलोने वाढ होऊन ती पुन्हा ५० हजार रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.
...तर सोने ५० हजाराच्या पुढे जाऊ शकतेअगोदरच कोरोनामुळे आवक कमी असल्याने सोने-चांदीच्या भावावर परिणाम होत आहे. त्यात आता भारत-चीन सीमेवर युद्धजन्य स्थिती राहिली तर सोने प्रति तोळा व चांदीही प्रति किलो ५० हजारांच्या पुढे जाऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.
---------
कोरोनाचा परिणाम असताना आता भारत-चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्याने सोने-चांदीच्या भावात वाढ होत आहे. - अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.
भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती राहिली तर सोने व चांदीचे भाव आणखी वाढून ते ५० हजाराच्या पुढे जाऊ शकतात. सोन्याच्या भावात ही उच्चांकी मानली जात आहे. - सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक.