मुंबई: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढ होत आहे. आज सोन्यानं 34 हजार 700 रुपयांचा टप्पा ओलांडला. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत भारतात सोन्याचा दर 6 डॉलरनं कमी असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. येत्या काही दिवसांत सोन्याचा दर आणखी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत सोन्याच्या दरात 3 हजार रुपयांनी वाढ होऊ शकते. त्यामुळे सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचा जून महिन्यातील दर पाहता 19 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला. याआधी 19 वर्षांपूर्वी जून महिन्यात सोन्याचा दर 1430 डॉलरवर जाऊन पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केल्यास भारतात सोन्याचा दर जवळपास 6 डॉलरनं कमी आहे, असल्याचं केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडियांनी सांगितलं. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज त्यांनी वर्तवला.
जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी सुरू आहे. याशिवाय जूनमध्ये अमेरिकन डॉलरचं मूल्यदेखील घटलं आहे. यामुळेच सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं एंजल ब्रोकिंग अनुज दत्ता यांनी सांगितलं. जगभरात मंदीसदृश्य स्थिती आहे. याशिवाय व्यापारयुद्धदेखील जोरात सुरू आहे. अमेरिकेनं इराणवर नवे निर्बंध लादले आहेत. अमेरिकेतील बँकांनी व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोनं खरेदी सुरू केली आहे.
सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ; 19 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत
सोन्याची झळाळी आणखी वाढण्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 10:12 AM2019-06-26T10:12:59+5:302019-06-26T10:17:50+5:30