जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत असतानाच सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. मंगळवारी सकाळी सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे. सोन्याच्या दरातील घसरणीसोबतच चांदीचे दरही पुन्हा एकदा ५६ हजारांच्या खाली आले आहेत. आज सोने आपल्या मागील बंद दराच्या तुलनेत 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेडिंग करत आहे. तर आता चांदी आपल्या मागील बंद दराच्यातुलनेत जवळपास 0.93 टक्क्यांच्या खाली ट्रेडिंग करत आहे.
सोने आणि चांदीची आजची किंमत -
आज सकाळच्या सुमारास मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर (MCX) 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 116 रुपयांनी घसरून 50,245 रुपये प्रती 10 ग्रॅमवर आला आहे. तर सकाळच्या सुमारास चांददीचा दर 521 रुपयांनी घसरून 55,570 रुपये प्रती किलोवर पोहोचला आहे. तत्पूर्वी सोन्याची सुरुवात 50,300 च्या पातळीवर झाली होती. तर चांदीच्या ट्रेडिंगची सुरुवात 55,681 पासून झाली होती.
जागतिक बाजारातील दर -
अमेरिकेच्या बाजारात सोन्याची स्पॉट प्राइस 1,708.94 डॉलर प्रती औंसवर पोहोचली आहे. तर चांदीची स्पॉट प्राईस 18.7 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये डॉलरमुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोन्यावर दबाव दिसत आहे.
काय म्हणतात तज्ज्ञ? -
तज्ज्ञांच्या मते भविष्यात सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. खरे तर, रशिया आणि युक्रेन युद्धापासून सोन्यावरील दबाव वाढताना दिसत आहे. यातच डॉलरच्या मजबूतीनेही सोन्यावरील दबाव कायम आहे. जागतीक बाजारात रशिया-युक्रेन युद्धाचा दबाव वाढल्यास पुन्हा सोन्याच्या भावात तेजी योऊ शकते. एवढेच नाही,तर रशियाने G7 देशांना सोने न देण्याचीही घोषणा केली आहे. यामुळे सोन्याचे दर वाढण्याची शक्यताही वाढली आहे.