नवी दिल्ली - गेल्या 20 दिवसांत सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. MCX वर, 10 ग्रॅम सोन्याचा वायदा भाव सकाळी 9.05 वाजता 155 रुपयांनी घसरून 51,721 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. आज दुपारच्या वेळी सोन्याचा दर 51,513 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवर होता. यापूर्वी सोने 51,721 या दरानेच खुले झाले होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर सकाळी सोने आणि चांदी दोन्हींच्याही व्यापाराला घसरणीसह सुरुवात झाली.
MCX वर चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे. सकाळच्या सुमारास एक्सचेंजवर चांदीचा वायदा भाव 316 रुपयांच्या घसरणीसह 68,520 रुपये प्रति किलोग्रॅम होता. सकाळी चांदी 68,511 या दरावर खुली झाली होती. महत्वाचे म्हणजे, केवळ 20 दिवसांतच सोन्याच्या दरात 4,087 रुपयांची घसरण झाली आहे. याच महिन्यातच्या दुसऱ्या आठवड्यात एमसीएक्सवर सोन्याचा दर 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला होता.
जागतिक बाजारात तेजी -
भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण होत असली तरी, जागतिक बाजारात मात्र सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.28 टक्क्यांनी वाढून 1,948.80 डॉलर प्रति औंस झाली आहे. तर, चांदीचा स्पॉट रेट 0.70 टक्क्यांनी वाढून 25.44 प्रति औंस झाला आहे.