नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोन्याच्या भावाने बुधवारी नवा तळ गाठला. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात सोन्याचा भाव ५१० रुपयांच्या आपटीसह २७,१९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सोन्याच्या भावामध्ये चालू वर्षात झालेली ही सर्वांत मोठी आपटी म्हणून याची नोंद झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या भावाने सहा आठवड्यांचा नीचांक गाठला. जागतिक घसरणीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्माते व किरकोळ व्यापारी यांच्या मागणीत घट झाल्याने बाजार कोसळला.औद्योगिक संस्था व नाणे निर्माते यांच्याकडून चांगली मागणी न झाल्याने चांदीचा भावही १,७०० रुपयांनी कोसळून ३७,२०० रुपये प्रतिकिलो झाला. सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी घटून १,२०६.४८ डॉलर प्रतिऔंस झाला. राजधानी दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ५१० रुपयांनी घटून अनुक्रमे २७,१९० रुपये व २६,९९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. गेल्या ३ जानेवारी रोजी सोन्याचा भाव या पातळीवर होता. आठ ग्रॅम गिन्नीचा भावही ५० रुपयांच्या घसरणीने २३,७०० रुपये झाला. तयार चांदीचा भाव १,७०० रुपयांनी स्वस्त होऊन ३७,२०० रुपये, तर चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १,६७५ रुपयांनी घटून ३६,६०० रुपये प्रतिकिलोवर आला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव २००० रुपयांच्या आपटीसह खरेदीकरता ६०,००० रुपये व विक्रीसाठी ६१,००० रुपये प्रतिशेकडा राहिला.
सोन्याच्या भावात ५१० रुपयांची घट
By admin | Published: February 19, 2015 12:24 AM